फळे खाणे आरोग्यासाठी खूप गरजेचे असते. त्यामुळे सहसा आपण सफरचंद, संत्री, मोसंबी, चिकू या फळांचे सेवन करतो. पण, बाजारात मिळणारी इतर फळेसुद्धा आवर्जून खायला हवीत. त्यातील एक म्हणजे रामफळ. रामफळ, ज्याला नेटेड कस्टर्ड ॲपल किंवा वाइल्ड मिठाई म्हणूनदेखील ओळखले जाते. हे उष्णकटिबंधीय, हृदयाच्या आकाराचे फळ आहे ज्याची त्वचा हिरवी-पिवळी तर चवीला थोडे तिखट आणि गोड असते. फळाचा आतला भाग पांढरा आणि मलाईदार आहे, तर तुम्ही रोज रामफळाचे सेवन केले तर काय होईल? तुम्ही रोजच्या आहारात त्याचा समावेश केला तर तुम्हाला कोणते फायदे मिळतील? मधुमेही रामफळाचे सेवन करू शकतात का?
रामफळाचे दररोज सेवन केले जाऊ शकते. कारण या फळात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६ सारखी पोषक तत्वे आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबरसारखी खनिजे असतात.
रामफळातील व्हिटॅमिन सी कंटेंट रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास योगदान, तर आहारातील फायबर नियमित आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देऊन नियमित पचन होण्यास मदत करतात. रामफळात असणारे अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करू शकते, तर पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, जे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स साधारणतः कमी ते मध्यम प्रमाणात म्हणजे ५४ टक्के आहे, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्ती सामान्यतः हे फळ खाऊ शकतात, पण अगदी कमी प्रमाणात. या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढत नाही. पण, रामफळाचे जास्त सेवन केल्यावर मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे.
रामफळ अनेक आरोग्य फायदे देत असले तरीही संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचे सेवन करणे आवश्यक आहे. कारण रामफळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पाचन समस्या किंवा पोषक तत्वांचे असंतुलन होऊ शकते.