
Weather Update : राज्यातील कोकण किनारपट्टीसह विदर्भात पुढील दोन दिवस तापमनात वाढ झाल्याचं पाहायला मिळेल. तर, मुंबईत दमट हवामान अडचणी वाढवताना दिसेल. गेल्या काही दिवसांपासूनच्या अतिभयंकर उकाड्यामुळं मुंबईकरांच्या अडचणीत भर पडली. तापमानाचा आकडा 38 अंशांपर्यंत पोहोचल्यानं शहरासह उपनगर क्षेत्रातही उन्हाळा अधिक तापदायक ठरताना दिसला. त्यातच अचानकत शुक्रवारी मात्र शहरातील तापमानात काहीशी घट झाल्याची नोंद करण्यात आली. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस तापमानात सरासरीहून साधारण 1 ते 2 अंशांची घट नोंदवली जाऊ शकते.
सहसा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एप्रिल ते मे दरम्यान तापमानाचा आकडा वाढत जात असल्याची बाब निदर्शनास येते. यंदा मात्र मार्च महिन्यापासून उकाडा वाढण्यास सुरुवात होणार असून, उन्हाळा मे महिन्यापर्यंत अधित तापदायक होणार असल्याचा इशारा हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे. राज्यासह देशात येणाऱ्या उष्णतेच्या लाटांटी संख्या तुलनेनं अधिक राहणार असून, त्यामुळं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
फक्त उन्हाळाच नव्हे, तर राज्यावर उन्हाळी पावसाचंही सावट असून, त्याचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिथं मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह होणारा हा पाऊस मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशांत महासागरात सक्रिय असलेला ला निना आता कमकुवत होत असून, येत्या काळात त्याची तीव्रता आणखी कमी होणार असल्याची शक्यता आहे. एप्रिलअखेर ला निना पूर्णपणे निष्क्रिय होणार असून यंदाच्या वर्षातील र्नैऋत्य मोसमी पावसावर मात्र याचा परिणाम होणार नाहीय. त्यामुळं यंदाचा उन्हाळा तापदायक असला तरीही त्यामागोमाग येणारा पावसाळा मात्र समाधानकारक असेल असाच अंदाज तूर्तास वर्तवण्यात आला आहे.