
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई– महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात युती होणार का, याबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या संभाव्य युतीबाबत राजकीय वर्तुळात विविध कयास बांधले जात असतानाच, शिवसेना (ठाकरे) गटाचे आमदार अनिल परब यांनी यावर सूचक वक्तव्य करत चर्चांना नवे परिमाण दिले आहे.
“शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष मनसेसोबत युती करण्यास सकारात्मक आहे. आम्ही राज ठाकरे यांना तसा प्रतिसाद दिला आहे. आता निर्णय त्यांच्यावर आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून युतीचा निर्णय घ्यावा,” असे परब यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही परदेश दौऱ्यावर असल्यामुळे युतीची चर्चा थोडीफार थांबली होती. मात्र दोन्ही नेते आता परतल्याने, ही चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवरच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही गुप्त भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मनसे कोणत्या गटासोबत युती करणार, हा प्रश्न आता अधिकच गडद झाला आहे. यावर भाष्य करताना अनिल परब म्हणाले, “कोणाशी युती करायची आणि कोणाशी नाही, हा निर्णय पूर्णपणे राज ठाकरे यांचाच आहे. आमच्याकडून सकारात्मक संकेत गेले आहेत. आता पुढचं पाऊल त्यांचं आहे.” राजकीय वर्तुळात या युतीचा प्रभाव पुढील निवडणुकांवर कसा पडतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. भाजप-शिंदे गट आणि ठाकरे-मनसे युती अशा नव्या राजकीय समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे.