
माणदेश एक्सप्रेस न्यूज|नवी मुंबई
मराठी रंगभूमीवर आपली अमीट छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांनी रविवारी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मनापासून कौतुक केलं. “एकनाथ शिंदे म्हणजे विलक्षण कलाप्रेमी माणूस, कलाकारांविषयी अपार प्रेम असलेला नेता,” असं भावनिक उद्गार अशोक सराफ यांनी व्यक्त केले. हा क्षण उपस्थित प्रेक्षकांसाठीही भावनिक ठरला.
‘कलासेवक’ सन्मान सोहळ्यात गौरव
मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई शाखा आणि बाल रंगभूमी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कलासेवक’ सन्मान सोहळ्यात अशोक सराफ आणि प्रख्यात सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना सराफ यांनी त्यांच्या अभिनय प्रवासातील अनुभव, प्रेक्षकांप्रती कृतज्ञता आणि कला क्षेत्रातले निरीक्षण महत्त्वाचे असल्याचे मुद्देसूदपणे मांडले.
“एकनाथ शिंदे – कलाकारांचे खरे पाठीराखे”
“माझा सत्कार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला, हे माझ्यासाठी गौरवाचं आहे. ते केवळ राजकारणी नाहीत, तर खरे कलाप्रेमी आहेत. कलाकारांच्या समस्या समजून घेणारा नेता मिळणं ही मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कारही त्यांच्या हस्तेच मिळाला होता, आणि आजचा क्षणही तितकाच विलक्षण आहे,” असं सराफ यांनी नमूद केलं.
“लोकांनी मला आवडलं, हेच खरं यश”
पुढे बोलताना अशोक सराफ म्हणाले,
“लोकांचं प्रेम, कौतुक हे माझ्यासाठी मोठं आहे. मी जे केलं, ते लोकांना आवडलं. पुरस्कार हे फक्त मानचिन्ह नसतात, ते जबाबदारीची जाणीव करून देतात. मला ‘लोकांना आवडेल ते’ करायची सवय लागली आणि तीच माझी ओळख ठरली.”
प्रशांत दामलेंच्या निरीक्षणशक्तीचंही कौतुक
कार्यक्रमात सराफ यांनी सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचंही मनापासून कौतुक केलं.
“दामलेकडे विलक्षण निरीक्षणशक्ती आहे. तो कधीही नुसता बसत नाही, सतत इतरांना बघून शिकतो. ही क्वालिटी फार कमी लोकांमध्ये असते आणि ती कलाकारांसाठी फार महत्त्वाची असते,” असं सांगत नवोदित कलाकारांनी निरीक्षणातून शिकण्याचा सल्ला दिला.