ताब्यातील संशयिताचा पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न; नातेवाईकांचा गोंधळ

0
314

माणदेश एक्सप्रेस न्यूज | विटा :
विटा पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री एका चोरीच्या संशयिताने संगणकाच्या वायरने गळा आवळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांची चांगली धावपळ झाली. प्रकाश शिवाजी चव्हाण (वय ४०, रा. सांडगेवाडी, ता. पलूस) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताचे नाव आहे.


विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे हणमंतनगर या उपनगरात प्रकाश चव्हाण व त्याचा साथीदार चोरी करण्यासाठी गेले होते. स्थानिकांनी हा प्रकार पाहून चव्हाणला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याचा दुसरा साथीदार मात्र फरार झाला. यानंतर दिवसभर पोलिसांनी कसून चौकशी केली. अखेर संशयिताने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्या कायदेशीर अटकेची प्रक्रिया सुरू होती.


रात्री दहाच्या सुमारास चव्हाणला एका खोलीत ठेवण्यात आले होते. पोलिस आरोग्य तपासणीसाठी पत्र तयार करत असताना चव्हाणने खोलीत ठेवलेल्या उपकरणाची वायर तोडून गळा आवळून घेण्याचा प्रयत्न केला. मोठा आवाज झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ खोलीत धाव घेतली आणि त्याच्या गळ्याला आवळलेली वायर काढून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.


घटनेची माहिती मिळताच मंगळवारी सकाळी ११ वाजता चव्हाणचे नातेवाईक पोलिस ठाण्यात दाखल झाले व त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या कारणामुळे पोलिस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी चिंचणी-वांगी, कडेगाव व आटपाडी पोलिस दलाला पाचारण करण्यात आले.


प्रकाश चव्हाणवर सध्या विट्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याठिकाणीही अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेमुळे विटा पोलिसांची चांगली धावपळ झाली असून परिसरात याबाबत मोठी चर्चा सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here