
माणदेश एक्सप्रेस न्यूज विटा / प्रतिनिधी : विटा नगरपालिकेत गेली 50 वर्षे एका ठराविक गटाने सत्ता सांभाळली; मात्र आता जनता परिवर्तनासाठी सज्ज झाली असून यावेळी सत्तांतर अटळ आहे, असा ठाम आणि स्पष्ट संदेश लिंगायत समाजाच्या भव्य सभेत उमटला.
सुरभी लॉन येथे आयोजित लिंगायत समाजाच्या बैठकीत बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, “ज्या-ज्या कुटुंबीयानी या शहरासाठी योगदान दिले, त्या प्रत्येक व्यक्ती आमच्याकडून उभी आहे. आता वेळ आली आहे — पन्नास वर्षांच्या एकाधिकारशाही पद्धतीला पूर्णविराम देऊन विकासाच्या नव्या युगाची सुरुवात करण्याची.”
ते पुढे म्हणाले, “लिंगायत समाजाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. समाजाच्या विकासासाठी आणि जनतेच्या गरजांसाठी आवश्यक असलेला प्रत्येक निधी प्राधान्याने उपलब्ध करून दिला आहे. मन्मथ मंदिर सभागृहासाठी 50 लाख रुपये दिले. बसवेश्वर पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम सध्या सुरू आहे. स्व. अनिलभाऊ बाबर यांनी लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीवरील आरक्षण उठविले. यापुढेही समाजाच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही.” विटा नगरपालिकेत सत्ता आमची आली तर एकही नगरसेवक चुकीचे काम करणार नाही; आणि चुकीचे काम करणाऱ्याचा राजीनामा तात्काळ घेतला जाईल.”
आमदार बाबर यांनी यावेळी शिवसेनेच्या व्हिजन आणि विकासाच्या दिशेची स्पष्ट मांडणी केली. “आम्ही एक व्हिजन, एक विचार आणि विकासाची स्पष्ट भूमिका घेऊन या निवडणुकीत उतरले आहोत. लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल शिवसेनेच्या माध्यमातूनच घडणार आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेत उपस्थित लिंगायत समाजबांधवांनी स्वर्गीय आमदार अनिलभाऊ व आमदार सुहास बाबर यांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “आम्ही कायम बाबर कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. यावेळी परिवर्तन निश्चित आहे,” असे आश्वासन लिंगायत समाजाने दिले. लिंगायत समाजाचा शिवसेनेला ठाम पाठिंबा आणि जनतेतील बदलाची उमेद यामुळे विटा नगरपालिकेत सत्तांतर आता अटळ असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
यावेळी संजय विभुते जिल्हाप्रमुख, तात्या कोरे, मुकुंद लकडे, शिरीष शेटे, विक्रम लकडे, महादेव कोरे, संजय लकडे, प्रकाश महाजन, अमित सगरे, पांडुरंग डोंबे, महादेव कोरे, राहुल कोरे, बच्चूशेठ नागराळे, स्वरूप पुणेकर, राजू तोडकर, शशिकांत कोरे, स्वप्निल कोरे, महेश लकडे, वैभव लाकडे, दीपक खलिपे, वैभव खलिपे, प्रणव खलिपे, जगदीश स्वामी जंगम, श्रीकांत रिसवडे, श्रेयस महाजन, अमोल करांडे, सुनील पुणेकर, बाळू पुणेकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


