
माणदेश एक्सप्रेस न्यूज | विटा :
विटा शहर हादरवून टाकणारी घटना आज (दि.२१) दुपारी घडली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या दुचाकीला भरधाव डंपरने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील प्रमिला धोंडी राम तांबे (वय ६२, रा. शितोळे गल्ली, विटा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा भाऊ राजेंद्र तांबे हे जखमी झाले.
अपघाताची भीषण घटना
दुपारी सुमारास तीन वाजता बहिण-भाऊ दुचाकीवरून सांगलीच्या दिशेने जात होते. याच वेळी मुरूमाने गच्च भरलेला डंपर (एम.एच. १२ एच.डी. ७९०३) भरधाव वेगाने मागून आला आणि त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत प्रमिला तांबे खाली पडल्या आणि दुर्दैवाने डंपरच्या मागच्या चाकाखाली सापडल्या. चालकाने डंपर थांबवण्याऐवजी वेग वाढवतच पुढे नेल्याने प्रमिला तब्बल ५० फूट ओढल्या गेल्या. यात त्यांचा जागीच चिरडून मृत्यू झाला.
भावाने डोळ्यांसमोर पाहिला बहिणीचा अंत
दुचाकीवर मागे असलेले प्रमिला यांचे भाऊ राजेंद्र तांबे हे विरुद्ध बाजूला पडल्याने बचावले. परंतु डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. स्वतःच्या बहिणीचा असा भीषण अंत डोळ्यासमोर पाहून त्यांनी आक्रोश केला. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चालक पकडला, पोलिसांच्या ताब्यात
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपर पाठलाग करून थांबवला व चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. चालकाचे नाव प्रकाश टोलू राठोड (वय ३२, रा. घुमटमाळ, विटा) असे असून, डंपर हा अनिल दिलीप जाधव (रा. विटा) यांच्या मालकीचा असल्याचे आरटीओच्या नोंदीवरून समोर आले आहे.
घटनास्थळी गर्दी, वाहतूक विस्कळीत
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. बघ्यांचा जमाव वाढल्याने पोलिसांना रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक बंद करावी लागली. पोलिसांनी पंचनामा सुरू करून पुढील तपास हाती घेतला आहे.
परिसरात हळहळ
भर चौकात डंपरखाली चिरडून महिलेला प्राण गमवावा लागल्याने शहरात शोककळा पसरली आहे. नागरिकांमध्ये संताप व भीतीचे वातावरण असून, अशा बेफाम धावणाऱ्या डंपर चालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.