‘ऑपरेशन सिंदूर’मधून आत्मनिर्भर भारताचे दर्शन – राधाकृष्ण विखे

0
21

माणदेश एक्सप्रेस न्युज/ शिर्डी : पहलगामच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आपली संरक्षण सिध्दता जगाला दाखवून देतानाच आत्मनिर्भर भारताचे दर्शनही घडविले आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून तयार झालेल्या संरक्षण साहित्याचा उपयोग करून, लढवय्या जवानांनीही पाकिस्तानला गुडघे टेकायला लावल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

 

ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कामगिरीबद्दल सीमेवरील जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिर्डीत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री विखे बोलत होते. निवृत जवान, शहीद जवानांचे कुटुंबीय, नागरिक, भाजप पदाधिकारी सहभागी होते. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देण्यात आल्या. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी निवृत जवान शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला.

 

मंत्री विखे म्हणाले, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला देशाने करारा जबाब दिला. पाकिस्तानच्या घरामध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. बळी पडलेल्या कुटुंबीयांच्या व सीमेवर लढणाऱ्या जवानांही देशवासियांचे पाठबळ आहे हे दाखवून देण्यासाठीच सर्वत्र तिरंगा रॅली उत्स्फूर्तपणे निघत आहेत. आपल्या तिन्ही सैन्यदलांनी एकत्रित यशस्वी कामगिरीतून समृध्द बलाढ्य आणि आत्मनिर्भर भारताचे दर्शन घडवले. मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशात उत्पादित झालेल्या संरक्षण साहित्याची यशस्विता जगाला समजली.

 

कर्नल व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी या दोन बहादूर भगिनींनी ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावलेली कामगिरी अभिमानास्पद ठरली. मात्र या देशात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांना आता पाकिस्तानात पाठविण्याची वेळ आली आहे. विरोधी पक्षाचे लोक जवानांच्या कर्तबगारीवर शंका उपस्थित करतात याचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. भारतीय नागरिक म्हणून आपणही वेळप्रसंगी कर्तव्य बजावण्याची तयारी ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.(स्त्रोत-लोकसत्ता)


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here