
माणदेश एक्सप्रेस न्यूज | सांगली :
“सातारा ही राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे आणि यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, थोरले शाहू महाराज, प्रतापसिंह महाराज यांची ही भूमी आहे. अशा क्रांतिभूमीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा आणि सन्मानाचा क्षण आहे,” अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी दिली.
विश्वास पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले या गावात झाला. आजोळ शिराळा तालुक्यातील बिळाशी. वडील शेतकरी कामगार पक्षाशी संलग्न नेते होते. संयुक्त महाराष्ट्र आणि स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग होता. वारणा खोऱ्यात, अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीने अजरामर झालेल्या भूमीतच त्यांचे बालपण गेले.
१९७५ मध्ये पुण्यात झालेल्या वासंतिक कथा स्पर्धेत त्यांच्या ‘कायदा’ या कथेला तिसरा क्रमांक मिळाला. त्याच काळात आंबी ही पहिली कादंबरी नवलेखक अनुदानातून प्रकाशित झाली. कोकरूडच्या यशवंत विद्यालयात शिकत असतानाच साहित्याची गोडी लागली आणि वारणेच्या संस्कारातून त्यांच्या लेखनाचा पाया भक्कम झाला.
प्राथमिक शिक्षण नेर्ल्यात झाले. पुढे पाचगणी येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये शिक्षण घेताना एका वर्षात तब्बल २३४ पुस्तके वाचल्याची आठवण त्यांनी सांगितली. महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये पूर्ण झाले. या काळात बिळाशीच्या भैरवनाथ नाट्य मंडळाच्या ऐतिहासिक नाटकांनी त्यांच्या विचारविश्वावर खोल ठसा उमटवला. “जाग मराठ्या जाग” आणि “देशद्रोही” सारख्या नाटकांनी शिवाजी-संभाजींचा वारसा त्यांच्या मनात रुजवला.
गावोगावच्या जत्रांमधील विठाबाई भाऊ मांग, दत्ता महाडिक यांच्या तमाशातील वगनाट्यांनी त्यांच्या लेखनशैलीवर परिणाम केला. ऐतिहासिक-सामाजिक विषय आणि पारंपरिक गाणी यांनी त्यांची शैली समृद्ध केली.
अवघ्या ३२व्या वर्षी झाडाझडती या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळवण्याचा मान विश्वास पाटील यांना मिळाला. साताऱ्यातील धरणग्रस्तांच्या वेदनांवर आधारित ही कादंबरी आजही लक्षवेधी ठरते. त्यानंतर क्रांतिसूर्य, पानिपत, पांगिरा, कलाल चौक अशा अनेक साहित्यकृती त्यांनी दिल्या. नुकतीच त्यांची ग्रेट कांचना सर्कस कादंबरी प्रकाशित झाली असून शिवरायांवरील आसमान भरारी लवकरच वाचकांसमोर येणार आहे.
“आजची तरुण पिढी मोबाइलच्या आहारी गेली आहे. त्यांना परत पुस्तकांच्या विश्वात आणण्यासाठी गावोगावी वाचन चळवळीचे आयोजन करणार आहे. मराठी साहित्याचा वारसा पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे विश्वास पाटील यांनी स्पष्ट केले.
न्यू कॉलेज, कोल्हापूरमधील प्रा. बी. यू. पवार, प्राचार्य कणबरकर तसेच शिवाजी विद्यापीठातील इंग्रजी विभागप्रमुख शांतिनाथ देसाई, समीक्षक म. द. हातकणंगलेकर, शंकर सारडा आदींचे मार्गदर्शन मिळाल्याचे ते सांगतात.