
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
विरार पूर्व परिसरात सोमवारी रात्री उशिरा झालेल्या इमारत दुर्घटनेत १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. या भीषण दुर्घटनेदरम्यान समोर आलेली एक कहाणी सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणणारी ठरली आहे. ओंकार जोईल कुटुंबाने त्यांच्या लेकीचा पहिला वाढदिवस आनंदाने साजरा केला, केक कापला… आणि अवघ्या पाच मिनिटांत त्यांच्या आयुष्यावर काळाचा घाला आला.
विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट ही इमारत सोमवारी कोसळली. या इमारतीत ओंकार जोईल यांचे कुटुंब राहत होते. त्या दिवशी त्यांच्या लेकी उत्कर्षा हिचा पहिला वाढदिवस होता. संपूर्ण घरात उत्साहाचे वातावरण होते. घर सजवण्यात आले होते. नातेवाईकांना फोटो, व्हिडिओ पाठवले जात होते. केक कापून उत्सवाची सुरुवात झाली होती.
मात्र केक कापून पाच मिनिटेही लोटली नव्हती, तोच इमारतीचा एक मोठा भाग कोसळला. हा ढिगारा शेजारील चाळीवर कोसळून मोठा अनर्थ झाला. यात उत्कर्षा आणि तिच्या आईचा जागीच मृत्यू झाला. तर वडील ओंकार जोईल हे अजूनही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुर्घटनेनंतर परिसरात आरडाओरड झाली. लोकांनी तातडीने धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. स्थानिकांनी आपला जीव धोक्यात घालून सात जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. या सर्वांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना विरार आणि नालासोपारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकृत आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रात्रीपासून अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस दलाकडून बचावकार्य सुरूच आहे.
विरार पोलिसांनी या दुर्घटनेसाठी संबंधित बिल्डर आणि जमीनमालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम, देखभाल अभावी आणि दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी सखोल तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वाढदिवसाच्या आनंदावर काळाचा डोंगर कोसळल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. जोईल कुटुंबीयांच्या घरात उमटलेल्या हशांचा आवाज क्षणात शांत झाला. आनंदाला मृत्यूची छाया लाभली. या दुर्घटनेने विरारसह संपूर्ण मुंबई हादरली असून, मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सर्वजण सहभागी झाले आहेत.