
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय व सामाजिक वातावरण तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांच्यावर आज तीव्र शब्दांत निशाणा साधला. “याच्या ताटाखालचं माजरं होऊन जगू का?” असा संतप्त सवाल करत त्यांनी जरांगे यांच्यावर मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये फूट पाडण्याचा आरोप केला.
वडेट्टीवार यांनी सांगितले की, “मनोज जरांगे यांच्या डोक्यात आता हवा गेलीय. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी करणे म्हणजे सरळ ओबीसी समाजावर अन्याय आहे. ईडब्ल्यूएसमधून ८.५ टक्के आणि खुल्या प्रवर्गातून आधीच मराठा समाजाला फायदा मिळतोय. तरीसुद्धा ओबीसींचे आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न का? हे समजत नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, “जरांगे-पाटील यांची भूमिका आता आंदोलनापेक्षा राजकीय झाली आहे. मराठा समाजातील तरुणांना चिथावणी देऊन ओबीसी नेत्यांविरोधात उभे करण्याचा हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे. ‘याला संपवा, त्याला संपवा’ अशा भाषेचा वापर करून समाजात वैमनस्य निर्माण करणे हे कोणत्याही प्रकारे योग्य नाही.”
वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकेची झोड उठवली. “राज्यात अशा प्रक्षोभक भाषणांना पायबंद घालण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार झोपलंय का? जरांगे-पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही, तर ओबीसी समाज शांत बसणार नाही. ओबीसींच्या अधिकारांवर कुणी गदा आणली, तर त्याचे परिणाम गंभीर होतील,” असा इशाराही त्यांनी दिला.
वडेट्टीवार यांनी पुढे सांगितले की, “ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुणी डल्ला मारायचा प्रयत्न केला, तर आम्ही रस्त्यावर उतरू. सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी की, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार का नाही. पण ओबीसींच्या कोट्यातून जागा देण्याचा विचार झाला, तर त्याला आम्ही तीव्र विरोध करू.”
दरम्यान, वडेट्टीवार यांनी नुकत्याच झालेल्या छगन भुजबळ यांच्यासोबतच्या बैठकीचाही उल्लेख केला. “भुजबळ हे ओबीसींचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अनेक वेळा इशारा दिला की, ओबीसी आरक्षणावर कुठल्याही प्रकारे आघात होऊ नये. मात्र, जरांगे-पाटील हे ओबीसींच्या विरोधात वातावरण तयार करत आहेत, हे स्पष्ट दिसतंय. अशा परिस्थितीत सरकारने तटस्थ न राहता ठोस पाऊल उचलले पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.
वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ओबीसी आणि मराठा समाजाच्या संघर्षाच्या दिशेने जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून व्यापक जनसमर्थन मिळाले असले, तरी त्यातून ओबीसी समाजाची नाराजी वाढताना दिसते आहे. ओबीसी आणि मराठा या दोन मोठ्या समाजगटांमधील तणाव सरकारसाठी डोकेदुखी ठरणार आहे. जरांगे-पाटील यांची भूमिका आरक्षणाच्या लढाईपेक्षा राजकीय रंग घेत असल्याचा सूर विरोधी पक्षनेत्यांच्या वक्तव्यांतून स्पष्ट ऐकू येतो. पुढील काही दिवसांत या वादाचा तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


