माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : मुलांना शाळेत दाखल करताना पालक निश्चिंत असतात. पालकांना विश्वास असतो की, आपल्या मुलाला आपण सुरक्षित शाळेत पाठवत आहोत; पण आटपाडी शहरातील जिल्हा परिषदेच्या साठेनगर प्राथमिक शाळेमध्ये मात्र असुरक्षित असल्याचे वातारणात निर्माण झाले आहे.
शाळांच्या पाठीमागील बाजूने व समोरील बाजूने गटर गेली आहे. सदर गटारीचे पाणी शाळेच्या मागील बाजूला व समोरील बाजूला येत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. याबाबत अनेक पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र याकडे प्रशासन कानाडोळा तर करत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळेच्या समोरील गटार उघडी असल्याने व त्या तुंबल्याने शाळेमध्ये प्रवेश करताना याच घाण पाण्यातून मार्ग काढत जावा लागत आहे.
शाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य आहे. शाळेच्या जवळच कचऱ्याचा ढिगारा व गटर पार केल्यावरच मुलांना शाळेत प्रवेश करावा लागतो. तसेच शाळेच्या जवळच आड असून यामधील पाणी देखील अस्वच्छ झाले आहे. त्याचा देखील फार मोठा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत असून रस्त्याची पार वाट लागली आहे.
येथील मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यांनी याबाबत वारंवार प्रशासनाकडे याबाबत तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे जर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर, याला जबाबदार कोण? असा सवाल पालक करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देवून शाळेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा लागेल.