
माणदेश एक्सप्रेस न्युज
तासगाव : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथे एम.एस्सी. संगणकशास्त्र (कॉम्प्युटर सायन्स) या विषयास महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाची मान्यता प्राप्त झाली आहे. ही मान्यता २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून लागू झाली असून त्यामुळे तासगाव व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर संगणकशास्त्र शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.
या संदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संस्थेचे अर्थ सहसचिव डॉ. मिलिंद हुजरे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “तासगावसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षणाची संधी देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांकडून एम.एस्सी. संगणकशास्त्र कोर्ससाठी मागणी होत होती. महाविद्यालयाने यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि शासनाची मान्यता मिळवली.”
महाविद्यालयात सध्या बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी., एम.ए., एम.कॉम., बीसीए, एम.एस्सी., तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम चालू आहेत.
एम.एस्सी. संगणकशास्त्र कोर्समुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षणासाठी आता स्थानिक पातळीवरच सुविधा मिळणार आहे. प्राचार्य डॉ. हुजरे यांनी विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि एम.एस्सी. संगणकशास्त्र (भाग-१) प्रवेश निश्चित करावा असे आवाहन केले आहे.