रक्षाबंधनाच्या दिवशी दुर्दैवी अपघात; भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक, एक ठार, एक गंभीर जखमी

0
207

माणदेश एक्सप्रेस न्यूज |सांगली :

रक्षाबंधनाच्या दिवशीच आनंदाचे वातावरण शोकात परिवर्तित करणारी घटना सांगली-सातारा मार्गावर घडली. काशीळ फाटा परिसरात उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव दुचाकी धडकल्याने बिळाशी (ता. शिराळा) येथील दत्तात्रय आनंदा पाटील (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागील आसनावर बसलेले संतोष वासुदेव शिंदे (वय ४०) गंभीर जखमी असून, त्यांच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद बोरगाव (सातारा) पोलिस ठाण्यात झाली आहे.

सासूरवाडीतून परतताना घडला अपघात

शनिवारी दुपारी संतोष शिंदे हे दत्तात्रय पाटील यांना सोबत घेऊन (दुचाकी क्र. एमएच १०-१०५३) आपल्या सासूरवाडी शेंद्रे (जि. सातारा) येथे गेले होते. नुकत्याच जन्मलेल्या बाळास भेट देऊन ते दोघे सायंकाळी परतत होते.

सायंकाळी अंदाजे ७:३० वाजता काशीळ फाट्याच्या पुढे रॉयल हॉटेलसमोर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळली. जोरदार धडकेत दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली.

वाटेतच प्राण गमावले

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून दोघांना ग्रामीण रुग्णालय, सातारा येथे रवाना केले. मात्र, वाटेतच दत्तात्रय पाटील यांचा मृत्यू झाला. संतोष शिंदे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

गावात शोककळा

रविवार, १० ऑगस्ट रोजी बिळाशी येथे दत्तात्रय पाटील यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. रक्षाबंधनाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी अपघाताने गावात हळहळ व्यक्त होत आहे. नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here