
माणदेश एक्सप्रेस न्यूज | १ ऑगस्ट २०२५
राज्यात नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून, खाते हाती घेताच त्यांनी इंदापूरच्या विकासाचा संकल्प जाहीर केला आहे. “इंदापूरला बारामतीसारखी प्रगती करून दाखवणार,” असा मनोदय त्यांनी पहिल्याच प्रतिक्रियेतून स्पष्ट केला आहे.
पहिल्याच दिवशी इंदापूरचा उल्लेख
भरणे म्हणाले, “मी शेतकरी कुटुंबातील आहे. पवार कुटुंब आणि विशेषतः अजितदादांनी मला भरभरून दिलं. आता इंदापूरला बारामतीप्रमाणे प्रगत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”
त्यांच्या या विधानामुळे इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आहे.
मंत्रीपदाबद्दल मानले आभार
भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नेते प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले.
“एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषी मंत्रालय मिळणं, याहून मोठा आनंद दुसरा कोणता असू शकतो?” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कर्जमाफीबाबत अपेक्षा
कृषी खात्याचे नेतृत्व हातात घेतल्यानंतर आता कर्जमाफीबाबत घोषणा होणार का? याकडेही सर्वांचं लक्ष आहे. मात्र भरणे यांनी स्पष्ट केलं की,
“अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. कर्जमाफीबाबत निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याच सल्ल्यानुसार होईल.”
खातेबदलाचं पडसाद
माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खाते बदलल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. कोकाटेंवरील नाराजीच्या पार्श्वभूमीवरच डॅमेज कंट्रोलसाठी खाते बदल करण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. भरणे म्हणाले,
“कोकाटे साहेब आमचे ज्येष्ठ आहेत. मंत्रिपद मिळालं हे योग्यच आहे.”
मुंडे प्रकरणावर भाष्य टाळलं
धनंजय मुंडे यांची मंत्रिपदाची मागणी चर्चेत असली तरी यावर भरणे म्हणाले,
“त्यांनी मंत्रिपद मागितलं होतं का याची मला कल्पना नाही. त्यामुळे यावर मी बोलणार नाही.”