सायकल दुकानातील चोरीच्या वादातून ज्येष्ठ पत्रकारावर कोयत्याचा जीवघेणा हल्ला

0
128

माणदेश एक्सप्रेस न्यूज | जत :

उमदी (ता. जत) येथे सोमवारी (दि. 15) सकाळी भरदिवसा एका हॉटेलमध्ये ज्येष्ठ पत्रकारावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मलकारी दत्तात्रय वायचळ (वय 68, रा. बसवेश्वर मंदिराजवळ, उमदी) असे जखमी पत्रकाराचे नाव असून, सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी संशयित गजेंद्र ऊर्फ गजू बाळासाहेब वायचळ (वय 56, रा. उमदी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली आहे.


संशयित गजेंद्र याचे सायकल दुरुस्तीचे दुकान आहे, तर मलकारी वायचळ पेपर विक्रीचे दुकान चालवतात. काही दिवसांपूर्वी गजेंद्रच्या दुकानात चोरी झाल्याची घटना घडली होती. या चोरीबाबत तक्रार देण्यासाठी तो उमदी पोलिस ठाण्यात गेला होता. मात्र, पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवली नाही.

याबाबत संशयित गजेंद्रला असा आभास झाला की, मलकारी वायचळ यांनी पोलिसांवर दबाव आणल्यामुळे तक्रार नोंदवली गेली नाही. या संशयातूनच त्याने सोमवारी सकाळी मलकारी वायचळ यांना त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यात मलकारी वायचळ गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सांगलीच्या ठसेतज्ज्ञांनीही घटनास्थळी भेट देऊन ठसे गोळा केले. दरम्यान, आरोपी गजेंद्र वायचळ याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.


या घटनेनंतर उमदी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त दक्षता घेतली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here