उजनी धरणाच्या पातळीत वाढ; मे महिन्यातच दौंड येथून विसर्ग सुरू

0
103

भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसाचा परिणाम, शेतकऱ्यांमध्ये समाधान

माणदेश एक्सप्रेस न्युज|टेंभुर्णी– भीमा खोऱ्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. दौंड येथून उजनी धरणात विसर्ग सुरू झाला असून, रविवारी सायंकाळी १०,६८४ क्युसेक पाणी उजनीत मिसळले.

 

गेल्या २४ तासांत धरणाच्या पातळीत तब्बल ४ टक्के वाढ झाली असून, आठ दिवसांत सुमारे ५ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. सध्या उजनी धरणाची पातळी वजा १४.३३ टक्के असून, एकूण साठा ५६ टीएमसी इतका झाला आहे. शनिवारी उजनी परिसरात ३४ मिमी तर गेल्या आठ दिवसांत एकूण १७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. रविवारीही दिवसभर पावसाचा जोर कायम होता. यामुळे धरण परिसरात पाणीसाठ्याची स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे.

 

यावर्षी पहिल्यांदाच मे महिन्यात दौंड येथून उजनीत विसर्ग सुरू झाला आहे. मागील वर्षी ४ जूनपासून हा विसर्ग सुरू झाला होता, तर सामान्यतः हा विसर्ग जून अखेरीस किंवा जुलैमध्ये सुरू होतो. त्यामुळे यंदा उजनी धरण लवकर मृत साठ्याबाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

मान्सूनपूर्व पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मे, जून आणि जुलै महिन्यांमध्ये निर्माण होणाऱ्या दुष्काळी स्थितीची चिंता यामुळे काही अंशी कमी झाली आहे. नीरा नदीत लाटे येथे २६ हजार क्युसेक विसर्ग सुरू असून, तो भीमा नदीत संगमजवळ मिसळत आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणासाठी पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here