
माणदेश एक्सप्रेस न्यूज | वारणावती :
सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात वसलेले उदगिरी पठार सध्या दुर्मीळ फुलांच्या बहाराने नटले आहे. निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी ही एक अविस्मरणीय पर्वणी ठरत असून, सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. डोंगराळ भागातील शांत वातावरण, वार्यावर डुलणारी रंगीबेरंगी फुले आणि सह्याद्रीच्या कुशीत उलगडणारे सौंदर्य या सर्वांचा मिलाफ उदगिरी पठाराला मिनी कास पठार म्हणून प्रसिद्धी मिळवून देत आहे.
दुर्मीळ वनस्पतींचा बहर
शाहूवाडी तालुक्यात वसलेले हे पठार अनेक दुर्मीळ आणि स्थानिक वनस्पतींनी सजलेले आहे. मंजिरी, स्मिथिया, धनगरी फेटा, सीतेची आसवे कुरडू, बुश कारवी, उदी चिरायत यांसारख्या वनस्पती येथे आढळतात. मात्र, यंदाच्या फुलोत्सवात सर्वाधिक आकर्षण ठरत आहे ती म्हणजे टोपली कारवी. निळसर-हिरव्या रंगात फुललेली कारवी पर्यटकांना मंत्रमुग्ध करत आहे. पठारावर चारही दिशांनी पसरलेल्या या फुलांची शोभा अतिशय मनमोहक असून, पाहणाऱ्यांच्या मनात कायमची घर करून राहते.
हवामानाचा अनुकूल परिणाम
दरवर्षीप्रमाणेच सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळातच या वनस्पतींना फुले येतात. यंदा हवामान अनुकूल ठरल्याने फुलांचा बहर अधिक समृद्ध आणि आकर्षक आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत हे पठार फारसे प्रसिद्ध नव्हते. मात्र सोशल मीडिया आणि स्थानिक वृत्तपत्रांतून या ठिकाणाची माहिती अधिकाधिक पसरू लागल्याने पर्यटकांचा ओघ वाढत चालला आहे.
पर्यटनस्थळांचा संगम
उदगिरी पठार हे केवळ फुलांसाठीच नाही, तर जवळील पर्यटनस्थळांसाठीही पर्यटकांना आकर्षित करत आहे. चांदोली धरण, गुढे पाचगणी पठार, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांसारख्या ठिकाणांच्या सहलीत उदगिरी पठाराची भर पडली आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींना एका दिवशी अनेक पर्यटनस्थळांचा अनुभव घेता येतो.
कसे जाल उदगिरी पठारावर?
सांगलीमार्गे : सांगली – शिराळा – कोकरूड – शेडगेवाडी – आरळा – शित्तूर – उदगिरी पठार (अंदाजे अंतर : 110 कि.मी.)
सातारामार्गे : सातारा – कराड – पाचवड फाटा – शेडगेवाडी – आरळा – शित्तूर – उदगिरी पठार (अंदाजे अंतर : 120 कि.मी.)
पर्यटकांची मागणी
उदगिरी पठाराची फुलांची शोभा पाहिल्यावर अनेकांना कास पठाराची आठवण होते. येथील वातावरण आल्हाददायक असून, निसर्गाचा मोहक नजारा पर्यटकांना खिळवून ठेवतो. मात्र शासनाने येथे योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा पर्यटक व्यक्त करत आहेत. तसेच दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन व्हावे, अशीही मागणी होत आहे.


