
माणदेश एक्सप्रेस/ मुंबई : कोकणातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला बसणारे धक्के थांबण्यास तयार नाही. उद्धव ठाकरे यांचा गड असलेल्या कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. राजन साळवी, माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यानंतर आता पुन्हा दापोलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. दापोलीचे उपनराध्यक्षासह सहा नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडत आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा दापोलीत पक्षप्रवेश कार्यक्रम होत आहे.
कोकणात शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ सुरु आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक जण पक्ष सोडून जात आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेचा निष्ठावंत चेहरा असलेल्या राजन साळवी यांनीही ठाकरेंची साथ सोडली. आता दापोली नगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. या ठिकाणावरुन उपनगराध्यक्षासह सहा नगरसेवक ठाकरे यांची साथ सोडत आहे. या सर्वांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे जावून वेगळा गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले होते.
कोकणात शिवसेनेची गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर बैठक घेतली होती. या बैठकीत पक्षातील गळती रोखण्याबाबत चर्चा झाली. शिवसेना नेते भास्कर जाधवसुद्धा पक्षावर नाराज आहेत. ते आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहे. त्यामुळे भास्कर जाधवसुद्धा उद्धव ठाकरे यांना धक्का देणार का? हे येत्या काही दिवसांत दिसणार आहे.