“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचं आहे पण…”; चंद्रकांत पाटील यांचा दावा

0
150

माणदेश एक्स्प्रेस/मुंबई : २०१९ मध्ये महायुतीला जनमताचा कौल मिळाला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे वाटून घेण्याचा विषय काढला आणि युती तुटली. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाविकास आघाडीमधल्या शिवसेनेत २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी सर्वात मोठं बंड केलं आणि ४० आमदारांना घेऊन ते भाजपासह गेले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी एक दावा केला आहे.

 

 

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३७ जागा मिळाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची दोन ते तीनवेळा भेट घेतली. तसंच आदित्य ठाकरेंनीही भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे बरोबर येणार का? या चर्चाही रंगल्या. मात्र दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचं उत्तर नाही असं दिलं होतं. दीड महिन्यापूर्वी एका राजकीय मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे आले तर त्यांना बरोबर घेणार का? हा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर त्यांनी तातडीने नाही म्हटलं होतं. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी भुवया उंचावणारं वक्तव्य केलं आहे.

 

 

उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची समजूत घालून किंवा दिल्लीत चर्चा करुन आली नाहीत तर मुंबईत ठाकरेंना उमेदवार मिळणार नाहीत. अर्थात त्यांनी यायचं की नाही, त्यांना बरोबर घ्यायचं की नाही हे माझे विषय नाही. याचा अर्थ असा आहे का की ते मागे लागलेत? मी एक अंदाज वर्तवला आहे. जर ते आले नाहीत गळती लागत लागत इतकी लागेल की पुणे, कोल्हापूर सोडून द्या ठाकरेंना मुंबईत उमेदवार मिळणार नाहीत. असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here