उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले कारण मी…; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

0
328

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर आयोजित केलेला दसरा मेळावा संपल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपवर आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर जोरदार हल्लाबोल करत भाजपला चिमटे काढले. याच भाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी थेट टोला लगावत म्हटले, “मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो की त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले.”


शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपवर हल्ला करताना म्हटले होते की,
“आम्हाला जर हिंदुत्व शिकवायचं असेल, तर भाजपने आधी आपल्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाकावा. कारण तो भगवा नाही. भगवा हा शिवसेनेच्या हातात आहे.”
ठाकरेंच्या या विधानावरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तराची झोड उठवली.


प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले,
“मी पूर्वीच जाहीर केले होते की उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाच्या संदर्भातील एक मुद्दा दाखवा आणि तुम्हाला 1000 रुपये देतो. त्यामुळे मी स्वतः उत्सुकतेने लोकांना विचारले की भाषणात काही विकासावर बोलले का? पण संपूर्ण भाषणात विकासाचा एकही मुद्दा निघाला नाही. उद्धव ठाकरे हे बोलूच शकत नाहीत. त्यामुळे माझे 1000 रुपये वाचले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.”

याप्रसंगी त्यांनी उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक हल्ला चढवताना म्हटले की,
“त्यांचे भाषण म्हणजे फक्त स्वगत असते. कारण पुढे माणसंही कमी असतात. लोकांच्या समस्या, कल्याणकारी योजना, विकास किंवा राज्याला पुढे नेण्याबाबत एकही शब्द त्यांनी काढला नाही.”


फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या अतिवृष्टी आणि आपत्ती व्यवस्थापनावरील आरोपांवरही पलटवार केला. ते म्हणाले,
“आम्ही राजकारण बाजूला ठेवलं तर त्यांनीही ठेवलं पाहिजे. पण उद्धव ठाकरे जेव्हा सत्तेत होते, तेव्हा आपत्ती काळात काय उपाययोजना केल्या, कोणते निर्णय घेतले, हे त्यांनी आरशात पाहायला हवं.”


फक्त उद्धव ठाकरेंवरच नव्हे, तर काँग्रेस नेते राहुल गांधींवरही फडणवीसांनी निशाणा साधला.
“राहुल गांधींना भारताच्या संविधानावर विश्वास नाही. कारण त्यांना इतिहास माहित नाही. त्यांच्या आजी इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून संविधान बदलले, एकाधिकारशाही आणण्याचा प्रयत्न केला. पण जनतेने त्यांना सत्तेतून बाहेर फेकले. राहुल गांधी हे सीरिअल लायर आहेत. त्यांचा दिमाग कमजोर आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली.


दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाकयुद्धामुळे महाराष्ट्राचे राजकारण अधिकच तापले आहे. ठाकरे गटाने भाजपला हिंदुत्वावरून आव्हान दिलं, तर फडणवीसांनी विकासाच्या मुद्द्यावर ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे–फडणवीस या नेत्यांमध्ये अशा टीका-प्रत्युत्तरांचा सिलसिला अधिकच रंगणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून दिले जात आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here