
माणदेश एक्सप्रेस न्युज | लातूर/धाराशिव :
मराठवाड्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे जगणे उध्वस्त झाले असून, शेतजमिनी वाहून जाणे, पिकांचे पूर्णपणे नुकसान होणे अशा भीषण परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दौरा केला होता. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही लातूर व धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
काटगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या वेळी त्यांनी सरकारवर थेट निशाणा साधत विचारले, “शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?” असा सवाल करत त्यांनी सध्याची मदत अत्यंत अपुरी असल्याचे ठासून सांगितले.
पूर आणि अतिवृष्टीमुळे जमीनच वाहून गेली असून, नव्याने माती टाकण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी हेक्टरी ५० हजार रुपये मदत आणि सरसकट कर्जमाफीची मागणी सरकारकडे मांडली.
शेतकऱ्यांच्या या मागण्यांना दुजोरा देत उद्धव ठाकरे म्हणाले, “हीच खरी वेळ आहे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची. मदतीचे जे निकष सरकारने २०२३ च्या नियमांप्रमाणे ठरवले आहेत, ते आजच्या परिस्थितीसाठी अत्यंत तुटपुंजे आहेत. तातडीने मदत वाढवून देणे सरकारसाठी अपरिहार्य आहे.”
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकताना उद्धव ठाकरे भावूक झाले. “मी तुम्हाला धीर द्यायला आलो आहे. कुणीही या आस्मानी संकटामुळे खचून जाऊ नका. वेडंवाकडं पाऊल उचलू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
ठाकरे पुढे म्हणाले, “मराठवाडा नेहमी दुष्काळी म्हणून ओळखला जातो, पण या वेळी पूरपरिस्थितीने शेतकऱ्यांचा जगण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत आणि कर्जमुक्ती हवीच. आम्ही या मागणीसाठी आग्रही राहू. तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू आणि उर्वरित मागण्यांसाठी सरकारवर दबाव कायम ठेवू.”
उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे सरकारवर शेतकरी मदतीसंदर्भात दबाव वाढणार असल्याचे संक%


