
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|सांगली : “मी केवळ ७२ तासांचा मुख्यमंत्री असताना मराठवाड्यासह दुष्काळी भागांना महापुराचं अतिरिक्त पाणी वळवण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिली होती. पण नंतर सत्तेवर आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कामात अडथळा निर्माण केला,” असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सांगलीत भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, “कोल्हापूर, सांगलीत दरवर्षी १५० टीएमसीहून अधिक पाणी पुरामुळे वाया जातं. हे पाणी साठवून ते मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागांना वळवण्याच्या प्रकल्पाला जागतिक बँकेची २,३२८ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. राज्य सरकार ९९८ कोटी देणार असून एकूण ३,३२४ कोटी रुपयांचा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात उतरेल. येत्या १५ दिवसांत या कामाचं भूमिपूजनही होणार आहे.”
“उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला राजकीय दृष्टिकोनातून खीळ घातली. मात्र महायुती सत्तेत येताच या प्रकल्पाला गती देण्यात आली. आता पावसाळ्यापूर्वीच ही कामं सुरु करण्याचा निर्धार आहे,” असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापनावर बोलताना सांगितलं की, “पूर येणार, तो थांबवता येणार नाही. पण त्या पाण्याचा उपयोग करता येऊ शकतो. समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्यावर कोणाचाही हक्क नाही. त्यामुळे त्याचा उपयोग मराठवाड्यासारख्या भागांना दिलासा देण्यासाठी करणे हे शासनाचे कर्तव्य आहे.”
प्रकल्पाचे ठळक मुद्दे:
प्रकल्पाचा एकूण खर्च: ₹३,३२४.६३ कोटी
जागतिक बँकेची मदत: ₹२,३२८ कोटी
राज्य सरकारचा वाटा: ₹९९८ कोटी
१५० टीएमसी पाण्याचा पुनर्वापर
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दोन्ही भागांना फायदा हा प्रकल्प केवळ पाणीटंचाईच्या संकटावर उपाय ठरणार नाही, तर दोन वेगवेगळ्या भौगोलिक भागांमध्ये जलसंपत्तीचे संतुलन साधण्याचा एक आदर्श मार्ग ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.