उद्धव ठाकरे गटाची केंद्र सरकारकडे मागणी; बाळासाहेब ठाकरेंना…..

0
182

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली आहे. जर आपल्याला  बाळासाहेब ठाकरेंचा खरंच सन्मान करायचा असेल तर येत्या २६ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न जाहीर करावं. ही महाराष्ट्रातील आणि देशातील हिंदुंची मागणी आहे ती मान्य करावी अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार अरविंद सावंत आणि नेते दिवाकर रावतेही उपस्थित होते.

 

 

या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की,  देशातील लोकमान्य नेते असलेले बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. २०२६ मध्ये बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होईल. बाळासाहेब ठाकरे असे नेते होते जे ५० वर्ष कुठल्याही संविधानिक, सत्तेच्या पदावर बसले नाही तरीही त्यांनी जनतेवर अधिराज्य केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी यांच्यानंतर इतके यशस्वी नेते बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या स्वाभिमानाची लढाई लढली. हिंदूवर हल्ले सुरू झाले तेव्हा ते हिंदूंसाठीही उभे राहिले. आज अयोध्येत राम मंदिर उभं राहिले आहे ते बनवण्यात आणि त्यामागच्या आंदोलनात बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वोच्च आहे. आज बाळासाहेब ठाकरे नाहीत, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी कधी स्वत:साठी काही मागितले नाही. मात्र राज्यातील, देशातील आणि जगभरातील हिंदुंची मागणी आहे. बाळासाहेब ठाकरे यांना देशातील सर्वोच्च सन्मान मिळाला पाहिजे असं त्यांनी म्हटलं.

 

 

तसेच हा केंद्राचा विषय आहे, एखाद्या राज्याने भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस करू शकतात पण भारतरत्न, पद्म पुरस्कार देण्याचा अधिकार पंतप्रधान आणि गृह मंत्रालयाचा असतो. आतापर्यंतची यादी पाहिली तर अनेकांना शिफारस देण्याची गरज भासली नाही. एपीजे अब्दुल कलाम, सर्वपल्ली राधाकृष्ण, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही नरसिम्हराव, पंडित नेहरू, स्वामीनाथन, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, एनटीआर यांना कुठल्या राज्याने शिफारस केली नाही. भारतरत्नसाठी कुणीही शिफारस करत नाही. हा केंद्र सरकारचा निर्णय असतो. त्यासाठी केंद्रीय समिती किंवा गृह मंत्रालय, पंतप्रधान कार्यालाय यांच्या अख्यात्यारित्य विषय आहे. त्यामुळे नुसते ट्विट करण्यापेक्षा, इकडे येऊन भाषणात बाळासाहेब ठाकरेंबाबत आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही त्यांचा भारतरत्नने सन्मान करावा ही आमची साधी नम्र विनंती आहे असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.