Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल

0
51

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील अनियमितता, मतचोरी आणि तरुण मतदारांना प्रणालीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. “Gen Z युवकांना हे सरकार का घाबरते? १ जुलैनंतर १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या लाखो तरुणांना मताधिकारापासून दूर ठेवले जात आहे,” असा थेट सवाल त्यांनी केला.

मातोश्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत महत्त्वाची घोषणा केली. “१० नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होईल. त्यानंतर प्रत्येक शिवसेना शाखेमध्ये ‘मतदार ओळख केंद्र’ सुरू केले जाणार आहे. नागरिकांनी शाखेत येऊन मतदानाच्या यादीतील आपले नाव तपासावे. काही तक्रार असल्यास त्वरित दुरुस्ती करण्यात मदत केली जाईल”, असे त्यांनी सांगितले.


निवडणूक आयोगावर तीव्र टीका

उद्धव ठाकरे म्हणाले,
“मतचोरीच्या विरोधात नुकताच इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघाला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर पहिल्यांदाच सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर फेरफार झाले आहेत. आयोगाचा ‘सक्षम’ APP आणि सर्व्हर कोण हाताळतं याचा संशय आहे.”

त्यांनी आरोप केला की काही भागात एका घरात ४०-५० बनावट नावे नोंदवली गेली आहेत. तर काही घटनेत नागरिकांची नावे विनापरवाना वगळण्यात आली.

“कुणीतरी माझ्या नावाने अर्ज केला आणि नंतर माझ्या कुटुंबाची नावेही वगळण्याचा प्रयत्न झाला”, असा गंभीर दावा त्यांनी केला.


Gen Z मतदारांबाबत प्रश्न

ठाकरे यांनी युवा मतदारांचा मुद्दा ठळकपणे मांडला.
“१ जुलैपर्यंत नोंदणी असलेल्यांनाच मान्यता देण्यात आली. त्यानंतर १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या तरुणांना मतदान करता येणार नाही. जगभर Gen Z लोकशाही बदलण्यासाठी रस्त्यावर उतरते, मग या मुलांना मतदानापासून दूर का ठेवताय? सरकारला या तरुणांची भीती वाटते का?”

त्यांनी निर्मला सीतारामन यांच्या पतींचा उल्लेख करत म्हटले,
“त्यांनी ४५ लाख नावे मतदार यादीत घुसवली गेल्याचा आरोप केला होता. मग हे मतदार कुणी घुसवले? आणि आता लाखो तरुणांचे नाव वगळले जात आहे, हा कोणता न्याय?”


शिवसेनेची पुढील रणनीती

ठाकरे यांनी स्पष्ट केले,
“आम्ही निवडणुका टाळा असं म्हणत नाही. पण सुधारित आणि शुद्ध मतदार यादी तयार होईपर्यंत निवडणुका घेऊ नका.”

पक्षाच्या शाखांमध्ये लवकरच विशेष केंद्रे सुरू करून तरुणांना नाव नोंदवण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे.


शेतकरी कर्जमुक्ती मुद्द्यावर सरकारला घेरलं

पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी शेतकरी प्रश्नावरही सरकारला चांगलेच धारेवर धरले.

  • “शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे. मी मुख्यमंत्रिपदावर असताना २ लाख रूपयेपर्यंतची कर्जमाफी दिली.”

  • “पीकविम्याच्या नावाखाली काही ठिकाणी २ रुपये दिले जातात, हा शेतकऱ्यांचा अपमान आहे.”

  • “अतिवृष्टीच्या पाहणीसाठी येणारं केंद्रीय पथक फक्त दोन दिवसांत संपूर्ण राज्य पाहणार? हा विनोद आहे का?”

ते पुढे म्हणाले,
“३० जूनपर्यंत कर्जमाफीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मग हप्ते भरायचे की नाही? बँकांना फायदा होऊ नये म्हणता, पण जूनमध्ये कर्जमाफी केली तर फायदा कसा होणार नाही याचा खुलासा करा.”

ठाकरे यांनी मराठवाड्यात शेतकरी संवाद दौरा काढण्याची घोषणाही केली.


शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प

“शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. जमीन वाहून गेली, जनावरं दगावली, भरपाई मिळाली का? याचा पाठपुरावा करणार. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील”, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here