
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : तासगाव तालुक्यातील वज्रचौंडे येथून मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दि. २१ जुलै २०२५ रोजी पहाटे ५.४५ वाजता तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. याप्रकरणी प्रियांका अर्जुन यादव (रा. वज्रचौंडे) यांनी फिर्याद दिली होती.
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने संशयितांची माहिती गोळा केली.
पोहेकॉ. प्रकाश पाटील आणि सागर टिंगरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, माधवनगर परिसरातील जुन्या जकात नाक्यावर दोन संशयित एचएफ डिलक्स मोटारसायकलवरून सोनं विक्रीसाठी येणार असल्याचे समजले. पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली.
अटक केलेल्यांची नावे प्रविण भगवान गायकवाड (२८, रा. मळणगाव, ता. तासगाव) आणि रोहित अदिकराव सपकाळ (२३, रा. गौरगाव, ता. तासगाव) अशी आहेत. त्यांच्याकडून १.१५ लाख रुपये किमतीची ११.५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, आणि ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
चोरीचा गुन्हा कबूल करताना आरोपींनी सांगितले की, पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी वज्रचौंडे गावाजवळ मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावली होती. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कारवाईबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून, पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करत आहे.