मेंढ्यांच्या कळपात ट्रक घुसला; अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, पाच मेंढ्यांसह दोघे गंभीर जखमी

0
174

माणदेश एक्सप्रेस न्यूज | आष्टा :
पेठ सांगली महामार्गावर बावची (ता. वाळवा) फाट्याजवळ मंगळवारी (दि. 9) दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून पाच मेंढ्यांसह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव संजय आनंदा धनवडे (वय 50, रा. दुधगाव, ता. मिरज) असे असून त्यांचा मृत्यू जागीच झाला. तर दुचाकीवरील संदीप आदिनाथ पाटील (वय 32, रा. दुधगाव) व कळप घेऊन जाणारे मेंढपाळ हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक चालक उत्तम गणपती साळुंखे (रा. संजयनगर, सांगली) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


मंगळवारी दुपारी बावची गावातील नानासाहेब जोतिराम अनुसे हे आपला सुमारे 90 मेंढ्यांचा कळप घेऊन बावचीकडून आष्ट्याकडे जात होते. त्याचवेळी पेठ सांगली महामार्गावर वेगाने येणारा ट्रक (एमएच 45 डी 126) अचानक कळपात घुसला. यात दोन मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला तर पाच मेंढ्या गंभीर जखमी झाल्या.

या धडकेनंतर ट्रकने समोर असलेल्या दुचाकीला (एमएच 10 टी 5789) पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील संजय धनवडे यांचा मृत्यू झाला. सोबतचा संदीप पाटील गंभीर जखमी झाला. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचे मोठे नुकसान झाले.


घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिस ठिकाणी दाखल झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थ व नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here