
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई –
“हा महाराष्ट्र अदानी किंवा अंबानीने निर्माण केलेला नाही. गिरणी कामगार, शेतकरी, कामगार चळवळींच्या संघर्षातून उभा राहिलेला हा महाराष्ट्र आहे,” अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शशिकांत शिंदे, शेकापचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राऊत यांनी शेकाप आणि शिवसेनेच्या संघर्षमय इतिहासाची आठवण करून दिली आणि राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
शेतकरी, कामगारांचे योगदान विसरू नका
“फडणवीसांच्या पूर्वजांनी हा महाराष्ट्र निर्माण केला नाही. महाराष्ट्राचे जडणघडण शेतकऱ्यांनी, गिरणी कामगारांनी केली. लाल बावट्याने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, जेव्हा भाजप किंवा RSS अस्तित्वातही नव्हते,” असा टोला त्यांनी लगावला.
“शेतकरी आणि कष्टकरी आज संकटात आहेत. गेल्या पाच महिन्यांत तब्बल ५५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पण सरकार गप्प आहे. आवाज उठवला की अर्बन नक्षल ठरवून तुरुंगात टाकतात,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
शिवसेना-शेकाप संघर्ष एकाच धाग्यातून
राऊत म्हणाले, “शेकाप आणि शिवसेनेने नेहमी संघर्षातून काही मिळवलं. वाट्याला बरे दिवस आले की कोणी तरी येतं आणि तुकडे करतं. पण संघर्ष संपलेला नाही. लढा सुरूच राहील.”
“शेकापने यशवंतराव मोहितेंसारखा अर्थमंत्री दिला. त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक रचनेला दिशा दिली. शेकापच्या कार्यकर्त्यांनी समाजकारणातून नेतृत्व निर्माण केलं. आजही त्यांची पुण्याई महाराष्ट्रात जिवंत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
‘अर्बन नक्षलवाद’ ही भीती पसरवण्याची भाषा
“आज जर तुम्ही शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी बोललात, तर तुम्हाला ‘नक्षलवादी’ ठरवतात. लाल झेंडा घेतला, की तुरुंगात डाकलं जातं. ही दडपशाही थांबवावी लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.
राज ठाकरे – उद्धव ठाकरे एकत्र येणे ही सुरुवात आहे
शेवटी राऊत म्हणाले, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं ही सुरुवात आहे. पण त्याचबरोबर सर्व कामगार, शेतकरी, समाजवादी संघटनांनी एकत्र येणं आवश्यक आहे. आपल्याला पुढच्या लढाईसाठी तयार राहावं लागेल. महाराष्ट्राचं नेतृत्व पुन्हा मराठी माणसाच्या हातात यावं, यासाठी आपली सज्जता आवश्यक आहे.”