
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. पुण्यात ऋतुजा पाटील मृत्यूप्रकरणी हिंदुत्ववाद्यांनी काढलेल्या मोर्चात भाषण करताना त्यांनी पवार कुटुंबावर नाव न घेता आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवरील भाषा वापरत टीका केली. त्यांच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
पडळकर काय म्हणाले?
भाषणात पडळकर म्हणाले,
“संकष्टीचा दिवस असतो तेव्हा उपवास असतो, पण हे कुटुंब त्या दिवशी मटण आणायचं. एकादशीला चिकन खायचं. ते घर असं आहे की दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाताना मटण खाऊन जातं. तिची सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे आणि आई कोण आहे माहित नाही… असं एक ‘कॉकटेल’ घर आहे.”
या वक्तव्यानंतर उपस्थितांत क्षणभर शांतता पसरली, परंतु लगेचच राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र संतापाची लाट उठली. विशेष म्हणजे, पडळकर यांनी आपल्या भाषणात पवार कुटुंबाचे नाव घेतले नसले तरी इशारे स्पष्ट होते.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया
पडळकरांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) नेते प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया देताना त्यांना कडव्या शब्दांत उत्तर दिलं.
“भाजपने अशा पाळीव माणसांना पैशाने आणि पदाने गोठ्यात बांधून ठेवलं आहे. ती माणसं कायम विरोधकांवर भुंकत असतात. गोपीचंद पडळकर हे त्याच पाळीव टोळीतील आहेत. पवार साहेब आणि पडळकर यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. ज्यांच्यावर मंगळसूत्र चोरीप्रकरणात अटक झाली होती, अशा माणसाला बोलण्याचा अधिकार नाही.”
जगताप यांनी पुढे इशारा दिला की,
“तुमचा इतिहास लक्षात ठेवा आणि टीका करताना तारतम्य ठेवा.”
वादांचा नवा अध्याय
गोपीचंद पडळकर हे याआधीही अनेक वेळा पवार कुटुंबीयांवर गलिच्छ भाषा वापरत टीका करत आले आहेत. मात्र, सत्ताधारी भाजपकडून त्यांच्या या वक्तव्यांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र त्यांच्या या आक्रमक शैलीमुळे भाजपमधील अंतर्गत शिस्त आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.