तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा ‘हा’ पहिला आदेश

0
4

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी लगेचच अॅक्शन मोडमध्ये काम करताना दिसले. त्यांनी सोमवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयात पोहोचून पदभार स्वीकारला आणि पहिला आदेश जारी केला. त्यांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकऱ्यांना खूश करणार आहे. पंतप्रधान मोदींनी सोमवारी सर्वप्रथम किसान सन्मान निधी च्या 17 व्या हप्त्याला मंजुरी दिली. याचा फायदा 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना होणार असून सुमारे 20,000 कोटी रुपये वितरित केले जातील.

या फाइलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारताच पहिली फाईल शेतकरी हिताशी संबंधित असणे योग्य आहे. आगामी काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे.

या हप्त्यामुळे अंदाजे 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल आणि सुमारे 20,000 कोटी रुपयांचे वितरण होईल. काल सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात पोहोचले. सरकार स्थापनेनंतर आता सर्वांच्या नजरा विभागांच्या विभाजनाकडे लागल्या आहेत. आज दुपारी मंत्रिमंडळाची पहिली बैठक होऊ शकते. रविवारी रात्री राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान मोदींसह 30 कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले पाच राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे पीएम मोदी हे दुसरे व्यक्ती आहेत.

शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले की, देशातील 140 कोटी लोकांची सेवा करण्यासाठी आणि देशाला विकासाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळासोबत काम करायचे आहे. मंत्र्यांची ही टीम तरुणाई आणि अनुभवाचा उत्तम मिलाफ आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही.