‘या’ प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाचे निधन; वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
3

हिंदी चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सिकंदर भारती यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. त्यांनी 24 मे रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. 25 मे रोजी सकाळी 11 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेला चित्रपट जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

सिकंदर भारती यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या दिग्दर्शकाने ‘घर का चिराग’, ‘झालीम’, ‘रुपये दहा कोटी’, ‘भाई भाई’, ‘सैनिक सर उठा के जियो’, ‘दंडनायक’, ‘रंगीला राजा’, ‘पोलिस वाला’ असे चित्रपट बनवले आहेत. याशिवाय त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांसोबतही काम केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी पिंकी आणि तीन मुले सिपिका, युविका आणि सुकरात असा परिवार आहे.
चित्रपट दिग्दर्शकाच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सिकंदर भारती यांना चित्रपट हिट होणार की फ्लॉप याची त्यांना चिंता नसे. निकालाची चिंता न करता ते प्रामाणिकपणे आपले काम करायचे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी राजेश खन्ना, शाहरुख खान, अक्षय कुमार आणि गोविंदा यांसारख्या बड्या स्टार्ससोबत काम केले. त्यांनी जेव्हा जेव्हा चित्रपट बनवला तेव्हा त्याद्वारे प्रेक्षकांना खास संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.