
माणदेश एक्सप्रेस न्यूज|संभाजीनगर
राज्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. “उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहे,” या वक्तव्यावर उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी पडळकरांना चांगलेच झापले असून, “पडळकर तोंड सांभाळून बोला, संभाजीनगरात आलात तर सरळ करून टाकू,” असा इशाराच दिला आहे.
🔥 पडळकरांचं वक्तव्य काय?
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकतेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं की,
“2019 मध्ये जनतेने बहुमत देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. मात्र, उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केली. हे सूर्याजी पिसाळासारखे कृत्य आहे. उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत.”
💢 खैरेंचा संताप : “थर्ड क्लास, मूर्ख माणूस”
या वक्तव्यावर संतापून चंद्रकांत खैरे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली.
“उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांची औलाद आहेत. अशा नेत्यांविषयी सूर्या पिसाळाची औलाद असं म्हणणं ही नालायक, थर्ड क्लास वृत्ती आहे. पडळकरचं थोबाड काळं करावं लागेल,” अशी जहरी टीका खैरेंनी केली.
“पडळकर एकदम थर्ड क्लास, मूर्ख माणूस आहे. त्याला ना अक्कल आहे, ना औकात. तो संभाजीनगरात आलाच तर आम्ही सरळ करून टाकू. आमच्या नेत्यांविषयी असं बोलणं आम्ही सहन करणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
🔁 राजकीय वाद आणखी पेटणार?
खैरेंच्या या प्रतिक्रियेमुळे भाजप विरुद्ध ठाकरे गट असा नवीन वाद चिघळण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. यापूर्वीदेखील त्यांनी विरोधी नेत्यांवर अनेकदा जोरदार आणि टोकाचे आरोप केले आहेत.
🧾 राजकीय भाषेतील अधःपतन?
सतत गडद होत चाललेल्या या राजकीय टीका-प्रत्युत्तरांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चिंतेची लाट आहे. दोन मोठ्या पक्षांचे नेते एकमेकांविषयी अत्यंत खालच्या भाषेत बोलत असल्याने या वादाला फक्त मनोरंजन म्हणून न पाहता, राजकीय सभ्यता आणि वागणुकीचा स्तर किती खाली गेला आहे, याची झलक दिसते, असे भाष्य राजकीय निरीक्षकांकडून केले जात आहे.