
माणदेश एक्सप्रेस न्यूज |
राज्याचे नवे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी “वाकडं काम करून नियमात बसवतो” असे विधान केल्यानंतर त्यावरून निर्माण झालेल्या वादात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली असून, त्यांनी थेट “वाकडं काम करूनच ते सत्तेवर आले, सरळ मार्ग त्यांना कसा उमजणार?” अशी जहरी टीका केली आहे.
भरणे यांच्या वक्तव्यावरून राऊतांचे तोंडसुख
कृषीमंत्री भरणे यांनी महसूलविषयक कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की – “कारखान्याचा संचालक म्हणून वाकडं काम करून पुन्हा ते नियमात बसवतो, त्याची माणसं नोंद ठेवतात.”
या विधानावर विरोधक आधीच आक्रमक असताना, आता संजय राऊत यांनीही भरणेंवर आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
“ती सरळ मार्गाने सत्तेवर आलेली माणसं नाहीत. शरद पवारांच्या पक्षात होते, मग बेईमानी करून दुसऱ्या पक्षात गेले. जे वाकडं काम करून सत्तेवर आले, त्यांना सत्ता चालवता येणार नाही. हे विधान त्यांचं खरं रूप दाखवतं,”
असा रोखठोक इशारा राऊतांनी दिला.
धार्मिक तणाव आणि भाजपवर आरोप
दौंड तालुक्यातील यवत येथे काल दोन गटांमध्ये झालेल्या तणावपूर्ण घटनेवरही संजय राऊत बोलले. आक्षेपार्ह पोस्टमुळे निर्माण झालेल्या वातावरणात पोलिसांना अश्रुधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या घटनेवर भाष्य करताना राऊत म्हणाले –
“धार्मिक विद्वेष पसरवणं, कुरापती काढणं आणि त्यावर निवडणुकीत फायदा मिळवणं हे भाजपचं राष्ट्रीय धोरण बनलं आहे. याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील उद्योग, रोजगार आणि विकासावर होतो आहे.”
त्यांनी राज्य सरकारला सवाल केला –
“दौंड हा औद्योगिक पट्टा आहे, तिथं गुंतवणूक वाढते आहे म्हणताय, मग अशा घटनांमध्ये जबाबदार कोण? पोलीस आणि मंत्री झोपलेत का?”
भारत-रशिया संबंधांवरही टीका
राजकीय विधानांपलीकडे, राऊतांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली. रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
“रशिया भारताचा जुना मित्र आहे. अमेरिकेच्या दबावाखाली जाऊन भारताने रशियाशी व्यापार थांबवणं योग्य नाही. ट्रम्पने इशारा दिला म्हणून व्यापार थांबवला, हे सरकारचं अपयश आहे. भारत 140 कोटींचा लोकशाही देश आहे, ट्रम्प काय आम्हाला धमकी देणार?”