‘ही’ ४ फळे करू शकतात दातांवरील पिवळे डाग गायब! डेंटिस्टने सांगितलेले ‘हे’ उपाय वाचा

0
430

खळखळून हसण्यापासून तुम्हाला कोण थांबवतंय? काम, बॉस, घरात ही सगळी कारणं आपल्याला वेळेचं नियोजन करून व मानसिक स्वास्थ्य जपून दूर करता येतील. पण जर तुमचे दात तुमच्या हास्यात अडथळा आणत असतील तर मात्र तुम्हाला खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचायलाच हवी. नीट दात घासले तरी अनेकदा आपल्या आहारातील घटकांमुळे किंवा अन्य अनेक कारणांमुळे दातावर पिवळा थर जमा होऊ शकतो. काही वेळा हे डाग इतके गडद असतात की तोंड उघडून बोलायला सुद्धा अनेकांना संकोच वाटतो. पण यापुढे ही अडचण येऊ नये असे काही उपाय आज आपण पाहणार आहोत. सहज बाजारात मिळणारी काही फळे वापरून आपणही दातांना पांढरे शुभ्र बनवू शकता. ही फळे कोणती व त्यांचा फायदा काय याविषयी क्राऊन हब डेंटल क्लिनिक, पीतमपुरा येथील प्रोस्टोडोन्टिस्ट डॉ नियती अरोरा यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेली माहिती जाणून घेऊया..

दातांवरील डाग हटवण्यासाठी ‘या’ फळांचे सेवन करा!
डॉ. अरोरा सांगतात की, टरबूज, पपई आणि स्ट्रॉबेरीसारख्या फळांमध्ये मलिक ॲसिड असते, जे एक सौम्य ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते व दातांच्या पृष्ठभागावरील डाग हलके करण्यास मदत करते. ही फळे लाळेचे उत्पादन देखील उत्तेजित करतात, ज्यामुळे अन्नाचे कण व बॅक्टेरिया निघून जाण्यास मदत होते व परिणामी मुळातच दातांवर डाग पडण्याचे प्रमाण कमी होते. अर्थात डॉ. अरोरा यांनी हे ही अधोरेखित केले की केवळ फळे खाल्ल्याने तुमचे दात चमचमतील अशी अपेक्षा करू नका. यासाठी तुम्हाला उत्तम स्वच्छता बाळगण्याची गरज आहे. शिवाय कॉफी, रेड वाईनसारख्या डाग पाडणाऱ्या गोष्टींचे सेवन सुद्धा कमी करायला हवे.

दातांची चमक वाढवण्यासाठी अननस सुद्धा उत्तम काम करू शकतो. अननसातील पपेन आणि ब्रोमेलेन नावाच्या एन्झाईम्समुळे दातांच्या पृष्ठभागावरील प्रथिनांचे डाग निघून जातात ज्यामुळे दात अधिक उजळ दिसतात.

दातांच्या स्वच्छतेसाठी ‘ही’ यादी करा फॉलो
डॉ. ठक्कर आणि डॉ. अरोरा या दोघांनीही स्वच्छ व सुंदर दातांसाठी करायच्या गोष्टींची साधी सोपी यादी सुद्धा दिली आहे. ती खालीलप्रमाणे:

ब्रशिंग आणि फ्लॉसिंग: रोज निदान दोन वेळा ब्रश करणे ही दातांच्याच नव्हे तर पूर्ण तोंडाच्या आरोग्यासाठी फायद्याची बाब आहे.

निरोगी पदार्थांचे सेवन: फळे आणि भाज्या नैसर्गिकरित्या चघळताना प्लेक काढून टाकण्यास मदत करतात.

नॅचरल व्हाइटनर्स: तज्ज्ञांकडून टीथ व्हाईटनिंग जरी करून घेतलं तरी ते टिकवून ठेवण्यासाठी माफक प्रमाणात नैसगरिक व्हाईटनर्स जसे की वर नमूद केलेली फळे यांचा वापर करावा.

दातांसाठी घरगुती उपाय करताना काय काळजी घ्यावी?
दरम्यान, सावधगिरीचा एक इशारा देताना करिश्मा एस्थेटिक्सच्या कॉस्मेटिक डेंटिस्ट डॉ. निशा ठक्कर यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, दाताच्या सौंदर्यासाठी पूर्णपणे नैसर्गिक किंवा ट्रेंडी उपायांवर अवलंबून राहू नये. बेकिंग सोडा, कोळसा किंवा लिंबाचा रस वापरून केलेले घरगुती उपाय योग्यरित्या न वापरल्यास दातांवरील संरक्षक मुलामा खराब होऊ शकतो. हे टाळण्यासाठी आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार काही उपचार करून घेऊ शकता. यांचा प्रभाव सुद्धा अधिक वेळ टिकत असल्याने दीर्घकाळात हे उपाय अधिक फायद्याचे ठरतात.

 

निरोगी हास्याची सुरुवात निरोगी दिनचर्यापासून होते. नैसर्गिक किंवा वैद्यकीय तज्ज्ञांकडून करून घेतलेल्या दातांच्या स्वच्छतेला टिकवून ठेवण्यासाठी तोंडाची स्वच्छता राखणे खूप गरजेचे आहे. कोणताही उपाय थेट अवलंबताना आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा कारण हे उपाय थेट आपल्या तोंडावाटे शरीरात प्रवेश करणार असतात त्यामुळे त्याबाबत सतर्क राहून निर्णय घेणं खूप गरजेचं आहे.