राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana) सध्या चांगलीच चर्चेत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या योजनेच्या लाभावरुन आणि श्रेयावरुन जुंपल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यातच, एकीकडे महायुतीसोबत असलेल्या आमदार रवि राणा यांनी लाडक्या बहिणींना उद्देशून भाषण करताना मला आशीर्वाद न दिल्यास तुमच्या खात्यातून 1500 रुपये काढून घेईल, असे गमतीने म्हटले होते. आता, त्यावरुन मंत्रिमंडळ बैठकतही पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. लोकप्रतिनिधींनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी सुनावले. तर, दोन्ही उपमुख्यमंत्र्यानीही नाव न घेता आमदार रवि राणांना (Ravi rana) सुनावलं आहे. आता, मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्याचं त्यांनी म्हटलं.
रोज सकाळी 10 वाजता मुंबईत घराबाहेर येऊन खोट बोलतात, आज गोबेल्स असता तर त्यानेही आत्महत्या केली असती. जबाबदारीची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे, अदृश्य शक्तींनी पसरवलेल्या चुकीच्या गोष्टी आपणास दूर कराव्या लागतील. विरोधक सरड्यापेक्षा जास्त रंग बदलतात, तुमच्या खोटं बोलण्यामुळे सरडासुद्धा आत्महत्या करेल, असे म्हणत सामंत यांनी लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांच्या टीकेवरुन पलटवार केला आहे. तसेच, राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढवलं जाईल, असेही सामंत यांनी म्हटलं. त्यामुळे, आता लाडकी बहीण योजना ही निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा आणि प्रचाराचा मुद्दा बनत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बोलताना, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करू, असे म्हटले आहे.
विरोधक विकासावर बोलत नाहीत
काँग्रेस आग लावत आहे हे सांगण्याची जवाबदारी आपली आहे, महामानव डॉ. बाबासाहेब यांना निवडणुकीत पराभूत करणारे कोण (काँग्रेस) होते, हे संगण्याची जवाबदारी आपली आहे. काँग्रेस जळतं घर आहे, मला पक्षानं काय दिल हे पाहण्याची वेळ नाही, मी पक्षाला काय दिले हे सांगण्याची वेळ आहे. विरोधक म्हणतात आमचं सरकार आलं तर याला तुरुंगात टाकू,पण विकासाची एक गोष्ट न सांगता बदला घेण्याची भावना बोलून दाखवतात, असेही सामंत यांनी म्हटले.