आमीर खानच्या लेकाचा पहिलाच चित्रपट अडकणार वादाच्या भोवऱ्यात

0
4

 

बॉलिवूडचा “मिस्टर परफेक्शनिस्ट” अभिनेता आमिर खान याचा लेक जुनैद खान  आता सिनेइंडस्ट्री गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, जुनैदच्या पहिल्याच चित्रपटाला वादाचे ग्रहण लागले आहे. ‘महाराज’ या चित्रपटाच्या माध्यमातून जुनैद सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करत असताना या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या रिलीजला विरोध करत बजरंग दलाने मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

बजरंग दलाकडून याचिका दाखल
आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या पदार्पणातील चित्रपटाविरोधात बजरंग दलाने याचिका दाखल केली आहे. आपल्या याचिकेत बजरंग दलाने चित्रपटाच्या रिलीजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच न्यायालयाच्या देखरेखीखाली एका विशेष समितीकडे चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्याची मागणी केली आहे. महाराज चित्रपटात हिंदू धार्मिक गुरुंना नकारात्मक रुपात दाखवण्यात आल्याचा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या काही भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असेही बजरंग दलाने म्हटले आहे.

प्रमोशनशिवाय रिलीज होणार चित्रपट
‘महाराज’ हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नसून थेट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट कोणत्याही प्रमोशन किंवा टीझरशिवाय थेट OTT वर प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘महाराज’ची कथा काय?
‘महाराज’ हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित असून त्यात जुनैदसोबत जयदीप अहलावतची भूमिका आहे. हा चित्रपट 1862 च्या महाराज लिबेल केसवर आधारित आहे. हे प्रकरण भारतातील सर्वात महत्त्वाच्या कायदेशीर लढाईपैकी एक समजले जाते. चित्रपटात जुनैदने पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुलजीची भूमिका साकारली आहे. तर अहलावतने वल्लभाचार्य पंथाचे प्रमुख जदुनाथजी बृजरतनजी महाराज यांची भूमिका साकारली आहे.

‘महाराज’ मध्ये कोणते कलाकार?
‘महाराज’ चित्रपटात जुनैद खान, जयदीप अहलावत यांच्यासह विपुल मेहता, शालिनी पांडे, शर्वरी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी ‘यशराज फिल्मस एंटरटेन्मेंट’च्या बॅनर अंतर्गत केली आहे.