पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन झाला नाही; तिच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशीच पतीचा मृत्यू – सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त

0
442

माणदेश एक्सप्रेस न्यूज | खानापूर (जिल्हा सांगली) –
पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या विरहाने व्याकूळ झालेल्या पतीनेही शेवटी जगाचा निरोप घेतला. हे दोघेही काही दिवसांच्या अंतराने काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण आळसंद गावात हळहळ आणि शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबावर ओढवलेल्या या दुहेरी दु:खामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या हृदयद्रावक घटनेत पत्नी सुनीता थोरात (वय अंदाजे ६०) यांचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजारामुळे निधन झाले होते. त्यांच्या पाठीमागे पती धनाजी थोरात (वय अंदाजे ६५) हे होते. सुनीता यांचा अचानक झालेला मृत्यू पती धनाजी यांना असह्य झाला होता. त्यांच्या निधनानंतर ते मानसिकदृष्ट्या खचले होते आणि प्रचंड विरह वेदनेत होते.

पत्नीच्या जाण्याने झालेल्या भावनिक ताणामुळे धनाजी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका बसला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ६ ऑगस्ट रोजी पत्नीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे या घटनेने दु:खाचा कडेलोटच झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या घटनेने आळसंद गावात शोककळा पसरली असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांमध्ये ही गोष्ट चर्चेचा आणि हळहळीचा विषय ठरत आहे. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना “खरंच प्रेम म्हणजे काय असतं, ते त्यांच्या आयुष्याने दाखवून दिलं,” असे म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here