रक्तपांढरीची समस्या दूर करावी : डॉ. प्रियांका बाबर

0
189

माणदेश एक्सप्रेस न्युज
मायणी/प्रतिनिधी : “रक्तपांढरी (हिमोग्लोबिन कमतरता) हा सहजपणे न जाणवणारा परंतु शरीराची झीज करणारा आजार आहे. शरीरात लोह व प्रथिने यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे सरासरी ६०% महिला या आजाराने ग्रस्त असतात. हिरव्या पालेभाज्या, बीट व गुळ यांचे नियमित सेवन केल्याने रक्तपांढरीची समस्या दूर करता येईल”, असे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्र मायणी येथील आरोग्य अधिकारी डॉ.प्रियांका बाबर यांनी केले. त्या येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने माळीनगर येथे आयोजित केलेल्या श्रमसंस्कार शिबिराच्या प्रबोधन सत्रात ‘आपला आहार, आपले आरोग्य’ विषयावर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. स्वाती माळी होत्या.

 

 

प्रारंभी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. उत्तम टेंबरे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी आरोग्य सेविका सौ. राजश्री माने, सुधीर पंडित, आरोग्य सहाय्यक सौ. विद्या कुलकर्णी, सौ. नूतन घुले, सौ. धनश्री माने यांनी शिबिरातील सर्व स्वयंसेवक व ग्रामस्थ यांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये हिमोग्लोबिन, रक्तदाब व रक्तातील साखर यांची तपासणी केली. हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

 

 

आहार, व्यायाम व आरोग्य यांचा जवळचा संबंध असतो, असे स्पष्ट करून डॉ.प्रियांका बाबर पुढे म्हणाल्या, “प्रत्येकाने त्या त्या हंगामातील फळे, भाजीपाला व सकस ताजे अन्न सेवन केले पाहिजे.त्यासोबतच योगा, व्यायाम व ध्यानधारणा यासाठी वेळ काढला पाहिजे.तणाव मुक्त जीवन ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.” कार्यक्रमाचे कु. शुभांगी शिंदे हिने सूत्रसंचालन केले.तर आभार कु.कावेरी भिसे हिने मानले.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here