
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई
सॅन फ्रान्सिस्कोहून कोलकाता मार्गे मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI180 विमानात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विमानात प्रवास करणाऱ्या दोन महिलांनी अचानक जोरजोरात किंचाळायला सुरुवात केली. यामागचं कारण समजल्यावर उपस्थित प्रवासी आणि कर्मचारी देखील काही क्षण स्तब्ध झाले – कारण होता, त्यांच्या सीटजवळ दिसलेली लहान झुरळं!
या घटनेमुळे काही काळासाठी विमानात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. घाबरलेल्या महिलांना कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुसऱ्या जागी हलवलं आणि त्यांना शक्य तेवढा आरामदायक अनुभव देण्याचा प्रयत्न केला. मात्र, एअर इंडियाच्या या विमानातील स्वच्छता आणि सुरक्षेच्या व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
एअर इंडियाने या घटनेवर तातडीने प्रतिक्रिया देत अधिकृत निवेदन जारी केलं. यात त्यांनी प्रवाशांची जागा बदलल्याची माहिती दिली असून, कोलकाताला उतरल्यावर संपूर्ण विमानाची स्वच्छता करण्यात आल्याचे स्पष्ट केलं आहे. झुरळे पूर्णपणे काढून टाकण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
काय म्हणाली एअर इंडिया?
“सॅन फ्रान्सिस्कोहून कोलकाता मार्गे मुंबईला येणाऱ्या AI180 विमानात दोन प्रवाशांना झुरळे दिसल्याचे निदर्शनास आले. आमच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांच्या जागा बदलून त्यांना दुसरीकडे बसवलं. कोलकाता येथे उतरल्यावर ग्राउंड टीमने संपूर्ण विमानाची स्वच्छता केली. आमच्या विमानात नियमित फ्युमिगेशन केले जाते. अशा घटना टाळण्यासाठी आम्ही अधिक दक्षता घेणार आहोत,” असं कंपनीने स्पष्ट केलं.
प्रवाशांचा नाराजीचा सूर
या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रवाशांनी एअर इंडियावर ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून एअर इंडियाच्या सेवेसंदर्भात सातत्याने तक्रारी नोंदवल्या जात आहेत. अलीकडेच अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाच्या अपघातामुळेही कंपनी चांगलीच चर्चेत आली होती.
चौकशीचा आदेश
एअर इंडियाने या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू केल्याचे सांगितले आहे. झुरळ विमानात कशी शिरली याचा तपास सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील, असं कंपनीने आश्वासन दिलं आहे.