
माणदेश एक्सप्रेस/आटपाडी : आटपाडी शहरातील मुख्य व्यापारी पेठेत गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट दिसून येत असून, उन्हाच्या तीव्रतेने नागरिक बाहेर पडत नाहीत. मंगळवारी शहरातील तापमान ४० अंश सेल्सिअस इतके झाले होते. उन्हाचा पारा प्रचंड वाढल्याने त्याचा परिणाम व्यापारी पेठेवर होत आहे. तर गेल्या काही महिन्यांपूर्वी पेठेत झालेले रस्ते कामाच्या विलंबाचा फटका व्यापारी पेठेला बसला आहे.
तर, पेठेत पार्किंगची सोयच नाही. याशिवाय व्यापारी पेठेत बहुतांश ठिकाणी झालेल्या अतिक्रमणानेच पेठेचे महत्त्व कमी झाले आहे. नगरपंचायतने मास्टर प्लान केल्याशिवाय पुन्हा व्यापारी पेठेला महत्त्व येणार नसल्याचे मत व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.
आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी आटपाडीतील असणारी जुनी व्यापारी पेठ प्रसिद्ध आहे. सध्या येऊ घातलेल्या लग्नसराईसाठी व्यापारी पेठ सजली आहे, मात्र उन्हाची तीव्रता जास्त आहे. दुपारी एकनंतर नागरिक घरातून बाहेर पडण्यास धजावत नाहीत. गेल्या काही महिन्यांपूर्वी आटपाडीच्या व्यापारी पेठेतील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम, ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनचे काम एकत्रित सुरू झाले होते. ते काम एक वर्ष सुरू राहिल्याने व्यापारी पेठेत असलेल्या दुकानाकडे ग्राहकांची संख्या मंदावली आहे.
परिणामी, अनेक दुकाने हे व्यापारी पेठ सोडून बाहेर पडली आहेत. यामुळे व्यापारीपेठेचे महत्त्व सध्या तरी कमी होताना दिसत आहे. व्यापारी पेठेमध्ये अनेक दुकान गाळे आजही मोकळे असून, गाळेधारकांना भाडेकरूंची आस लागली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून इमारती बांधल्या, मात्र त्या सध्या रिकाम्या असल्याने मालकांना चिंता लागली आहे.