
माणदेश एक्सप्रेस न्युज
कोकण : यंदा पाऊस उशिरापर्यंत थांबल्याने तसेच लवकर सुरु झाल्याने कोकणचा राजा, महाराष्ट्रीयन हापूस लवकर अलविदा करणार आहे. हापूस आंबा प्रेमींसाठी ही महत्वाची बातमी आहे. एपीएमसी बाजारात पुढील आठवड्यापर्यंतच महाराष्ट्रातील हापूस मिळणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
यंदा एकूण उत्पादनाच्या २५ टक्केच हापूस आंबा बागांमध्ये दिसत होता. यामुळे सुरुवातीला आंब्याचे दरही चढे होते. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मोहोर फुलला होता, परंतू पाऊस पडल्याने हा मोहोर गळून पडला होता. दुबार मोहोरावरच यंदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त होती. पहिल्या मोहोरातील वाचलेले फळ आणि दुबार मोहोराचे फळानेच यंदा आंब्याचा सीझन मे महिन्याच्या मध्यापर्यंत नेला आहे.
कोकणात अनेक आंबा बागांमध्ये झाडावर एकसुद्धा आंबा दिसत नाहीय, अशी परिस्थिती आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सुरू होती. परंतू, मे महिन्यात ही आवक खूपच कमी झाली आहे. ढील आठवड्यापर्यंत हापूस आंब्याची आवक होणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. बदलत्या वातावरणाचा फटका आंबा पिकाला देखील बसला आहे. त्यामुळे यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच हापूसची आवक कमी झाली आहे. पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील हापूसची फक्त शेवटची आवक होणार असून, इतर राज्यातील आंब्यांची आवक सुरू राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
यावर्षी पावसाळा लांबल्याने डिसेंबरपासून थंडी सुरू झाल्याने मोहर प्रक्रियेला प्रारंभ झाला. पालवी व मोहर अशी संमिश्र स्थिती होती. कडाक्याच्या थंडीमुळे मोहर भरपूर आला, परंतु निव्वळ फुलोरा राहिला.फळधारणा झालीच नाही. मोहरही करपून काळा पडला व कांड्या गळून गेल्या. पुनर्मोहरामुळे फळांची गळ झाली. उरलेल्या फळांची गळती यंदाच्या उष्णतेने केली.