सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

0
296

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता विद्यार्थ्यांना प्रवास पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये वितरित करणार आहे. यामुळे पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एसटी कार्यालयांमध्ये रांगा लावण्याची गरज भासणार नाही. परिणामी त्यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.

 

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मोहीम राबविण्यात येत आहे. यापूर्वी विद्यार्थी अथवा त्यांचे पालक एसटीच्या पास केंद्रांवर जाऊन रांगेत उभे राहून पास मिळवत असत. अनेकदा गटागटाने आगार कार्यालयात जाऊन ही प्रक्रिया पार पाडली जात होती. आता मात्र शाळा आणि महाविद्यालयांनी दिलेल्या नावाच्या यादीनुसार, संबंधित विद्यार्थ्यांना पास थेट त्यांच्या शैक्षणिक संस्थेत एसटी कर्मचारी पोहोचवतील.

 

वेळ वाया जाणार नाही
‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ या विशेष मोहिमेला १६ जूनपासून औपचारिक सुरुवात होणार आहे. याआधी सर्व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना सूचना दिल्या आहेत की, त्यांनी नववर्षासाठी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवावी, जेणेकरून पास वितरण सुरळीतपणे पार पाडता येईल. या योजनेमुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या शाळेतच एसटीचा पास मिळणार असून, त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

 

विद्यार्थिनींना मोफत पास
दरम्यान, एसटीकडून विद्यार्थ्यांना प्रवास भाड्यात ६६.६६ टक्के सवलत दिली जाते. म्हणजेच विद्यार्थ्यांना केवळ ३३.३३ टक्के शुल्क भरून मासिक पास मिळतो. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना अंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना एसटी पास मोफत दिला जातो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here