
८ मार्च म्हणजे काय तर ८ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन हा दिवस म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या सन्मानाचा दिवस; प्रत्येक स्त्रीच्या अभिमानाचा दिवस; हा दिवस म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या शौर्याचा दिवस झालं! आजच्या दिवशी प्रत्येक स्त्री कोणाची तरी आई ताई बहीण मुलगी असते पण उरलेले 364 दिवस ती कोणाचे तरी पाखरू तर कोणाची तरी जानेमन ठरलेलीच असते. का हे सगळं असं का! स्त्रियांबद्दल बघितला जाणारा दृष्टिकोन एवढा वाईट का? आजचा दिवस मोठ्या स्वाभिमानाने आनंदाने साजरी करताना ! मग इतर दिवशी हाच तुमचा स्वाभिमान जातो तरी कुठे…!
मुलगी म्हणजे परक्याचं धन; मुलगी म्हणजे खर्च; मुलगी म्हणजे पीडा, असं म्हणणारे जागतिक महिला दिन साजरी करतातच का? खरंतर आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. कारण ८ मार्च जागतिक महिला दिन याच दिवशी एका आईच्या पोटी माझा जन्म झाला म्हणून मी तो दरवर्षी आनंदाने साजरी करते. परंतु टीव्हीवर वर्तमानपत्र असो किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज नवीन घटना ऐकायला मिळतात त्याचं काय! आजही एक स्त्री सुरक्षित नाही. ८ मार्च जागतिक महिला दिना दिवशी होम मिनिस्टर संगीत खुर्च्या यासारखे खेळ ठेवून काहीच नाही सिद्ध होणार त्यापेक्षा त्या स्त्रियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. तरच ती स्त्री सक्षम बनेल आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहील. आजही एक स्त्री जगामध्ये एकटी फिरू शकत नाही का तिला जगण्याचा अधिकार नाही का! रोज नव्याने दिवस उगवतो. तसच रोज नव्याने वाईट घटना कानावर ऐकायला मिळतात वयाच्या चार वर्षाच्या मुली पासून ते 30 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत आहे याला जबाबदार कोण आहे का! कोणी याची जबाबदारी स्वीकारेल का…!
बलात्कार होतो 15 मिनिटे बातमी होते. दोन तासाने मीडिया येथे चार तासाने आणि सरकार जागं होतं निरअपराधी जीवाचा बळी गेल्यावर दोन दिवसांनी. आरोपीला शिक्षा होणे लांबच तर त्याला त्यातून सही सलामातून बाहेर कसं काढता येईल याचा विचार केला जातो मग काय त्यासाठी आहेतच पुढारी, नेते पण विनाकारण बळी गेलेल्या जीवाला न्याय मात्र मिळतच नाही. आमच्या मुलीला न्याय द्या म्हणून ते कुटुंब दोन महिने कोर्टाच्या वाऱ्या करतात आणि आरोपी मात्र पिंजऱ्यातून सही सलामत सुटतात. परवाच एक पुण्यात घडलेली घटना शेकडो लोकांची रहदारी असणाऱ्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार झाला ही घटना अंगावर शहारे आणणारी वाटली पण नराधमाला फाशीची शिक्षा द्यायची हिम्मत मात्र कोणाचीच नाही झाली.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असं म्हणत रोज एक नवीन घटना विसरत चाललोय पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे असा विचार करण्याची क्षमता पण या देशात कमी पडत चालली. भारत माझा देश आहे आणि आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत असं म्हणणाऱ्या आपल्या देशात ही विकृती असणारी लोक आले तरी कुठून हा प्रश्न अजूनही तसाच आहे. माझी सरकारला एकच विनंती आहे की, महिलांना एसटीमध्ये हाफ तिकीट देण्यापेक्षा लाडकी बहीण योजना राबवून त्यांना दर महिन्याला दीड हजार रुपये हप्ता देण्यापेक्षा त्यांच्यासाठी असं काहीतरी करा की त्या स्वतःचा व्यवसाय करून त्यांच्या पायावर त्यांना उभा राहता येईल त्या स्वतःसाठी जगताना घराची जबाबदारी सुद्धा घेऊ शकतील. आणि सगळ्यात अगोदर तिच्या सुरक्षितेसाठी काहीतरी प्रयत्न करावा हीच एक आशा बाळगते.
आज ही व्यथा लिहण्या मागच एकच कारण ते म्हणजे आजही आपली एक स्त्री सुरक्षित नाहीये; आपली आई बहिण ताई कोणी सुरक्षित नाही. आणि तिला न्याय मिळावा म्हणून तसा प्रयत्न ही केला जात नाही त्यामुळे तिला न्याय मिळत नाही. आणि हेच कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणूनच हा लेख लिहिण्याचा छोटासा प्रयत्न. जगातील प्रत्येक स्त्री आपली आई बहीण आणि मुलगी आहे तिचा आदर करा. प्रत्येक स्त्री ने दुसऱ्या स्त्रीच्या पाठीशी उभे रहा. एवढंच नाही तर एक आई आपल्या मुलीला जेव्हा निर्भयपणे तिला घरातून बाहेर पाठवू शकेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने साजरा करता येईल ८ मार्च जागतिक महिला दिन..म्हणून माझ्या लेख च्या माध्यमातून मी सांगतेय स्त्रियांना जपा तिच्यासाठी जगा आणि मगच ८ मार्च हा दिवस मोठ्या अभिमानानेच काय तर स्वाभिमान आणि साजरी करा.
कु. रेश्मा आ. राजगे
मुढेवाडी ता. आटपाडी, जि. सांगली