ग्रामजीवनाचे भावविश्व आठवणींच्या हिंदोळ्यावर “आठवणींचा हिंदोळा” : लेखिका : सौ अरुणा शरद चव्हाण पाटील

0
187

बालपणीच्या आठवणी मनाच्या गाभ्यात खोलवर रुजलेल्या असतात. त्या कधी हसवतात, कधी डोळ्यांत नकळत पाणी आणतात, तर कधी जगण्याला नवी उभारी देतात. आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून मन भूतकाळाच्या रम्य प्रदेशात फेरफटका मारत राहतं. या आठवणींचीच जाणीव, त्यांच्या गोड-गोड आणि कडू-गोड लहरी, काही विचारांची शिदोरी ललित लेखांच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न लेखिका सौ अरुणा चव्हाण पाटील यांनी – “आठवणींचा हिंदोळा”.या पुस्तकामध्ये केला आहे.

 

माणसाच्या मनात सतत काही ना काही आठवणी दाटीवाटीने गर्दी करत असतात. सुखद क्षण,बालपणीच्या गमती-जमती, घरगुती प्रसंग, आई-वडिलांचे प्रेम, सख्यांनी सहज दिलेली साथ, या साऱ्या आठवणी जीवनाच्या प्रवासात सोबत असतात. काही आठवणी अंगभर ऊब देणाऱ्या शालीसारख्या असतात, तर काही आठवणी मनात कायमचा सल उमटवून जातात. तरीही त्या आपल्या असतात, आपल्याच असतात.

 

“आठवणींचा हिंदोळा” हे पुस्तक म्हणजे केवळ स्मरणरंजन नाही, तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उमटलेल्या भावनांचे प्रतिबिंब आहे. रम्य संध्याकाळी एकटेपणाच्या सावलीत विचारांचे फुलपाखरू जेव्हा झुल्यावर बसून झोके घेते, तेव्हा शब्दांना नव्या आशयाचा, नव्या जाणीवांचा हिरवा मोहोर फुटतो. तोच मोहोर कधी कागदावर उतरतो, कधी मनात गुंफला जातो.

 

‘आठवणींचा हिंदोळा’ या पुस्तकांमध्ये 35लेख आहेत. लेखिकेचे माहेर आणि सासर माणदेशातीलच आहे. तिचे बालपण माण मातीतच खेळण्याबागडण्यात गेले. बालपणात जो मनावर ठसा उमटला जातो. जे संस्कार होतात. तेच संस्कार,विचार पुढील आयुष्यात दिशा दाखवत असतात. जे मनाच्या आत खोलवर साठत जाते तेच साहित्यात शब्दरूपाने उतरत असते. माणदेशातील प्राणी,पक्षी, निसर्ग,सभोवतालचा परिसर, साहित्यिक परंपरा, लोककला या सर्वांचा परिणाम होत असतो. या सर्वांतील आलेले अनुभवांचा परिपाक म्हणजे‘ आठवणींचा हिंदोळा’.

 

भूतकाळात घडून गेलेल्या काही घटना व सद्यस्थितीत घडलेल्या काही घटना या दोन्ही घटनांचा तुलनात्मक विचारमंथन करून जो शब्दरुपी लोण्याचा गोळा वरती आला तो या लेखांमध्ये मांडला आहे. हरवलेलं अंगण, अडगळीच्या वस्तू, दुपार, आठवणीतली दिवाळी, चैत्र पालवी, बदललेला समाज, माझी शाळा, विरंगुळा, शुभमंगल सावधान, सदाफुली, या लेखांमध्ये काल आणि आज या दोन्ही काळाचा विचार करता लेखिका म्हणते की,“उद्याच्या आनंदासाठी भूतकाळ पोटात घालून भविष्याची स्वप्न रंगवत वर्तमानात जगायचं असतं “. पुढे ती म्हणते की,“चैत्रपालवी प्रमाणे आपल्या मनातही उत्साहाची नवचैतन्याची पालवी फुटायलाच हवी.”

 

. जीवनाचा प्रवास हा सर्वांनाच करावा लागत असतो. काळाप्रमाणे प्रत्येकाला वागावेच लागते. काळ कोणासाठी थांबत नाही. सर्व जगाला हादरवून टाकणारा कोरोनाचा काळ. आता या क्षणी काय घडेल कोणती वाईट बातमी येईल या विचारांनी सर्व जग सैरभैर झालेलं परंतु तरीही त्या परिस्थितीत कसं वागायला हवं. हे सांगताना लेखिका म्हणते की, “माणसाला कोणत्याही प्रकारचा विरंगुळा असला की माणसाचं जगणं सुद्धा त्या फुलांप्रमाणे रंगबिरंगी सुवासित आणि टवटवीत होतं”
‘मोबाईल व्यसन की गरज ‘, ‘शिक्षण आणि संस्कार’ ‘वैशाख वणवा ’ संस्काराची शिदोरी’, ‘शुभमंगल सावधान ‘ या वैचारिक लेखांमध्ये लेखिका स्वतःचे विचार मांडते कि, ‘साधने शाप किंवा वरदान नसतात. त्याला वापरणारी माणसं ते शाप की वरदान ठरवतात.

 

तसेच ती सांगते कि,‘ माणसाने माणसाशी माणसासारखे वागण्यासाठी शिक्षणाची नाही तर संस्काराची गरज आहे ‘आणखी एक सल्ला सदृश्य म्हणते कि, ‘शुभमंगल सावधान म्हणण्याआधी लग्न जमवताना सावधानता बाळगली पाहिजे ‘म्हणजे आज समाजामध्ये घटस्फोटाचे जे प्रमाण वाढले आहे. त्याची खबरदारी म्हणून अगोदरच सर्व चौकशी करून मगच पुढचे पाऊल उचलले पाहिजे आणि ‘ व्यवहारात माणसाने चोख असावं.नाती आणि व्यवहार या दोन वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत.’ असे लेखिकेची निरक्षर आजी नातवंडांना समाजभान देते.

लेखांमध्ये माणदेशातील बोली भाषेतील अनेक शब्द आले आहेत. काही शब्द त्या वस्तूंबरोबरच लुप्त ही होऊ पाहत आहेत. शेलकाट, काटवट, साळुता, तवली,जाते असे शब्द पुढल्या पिढीला फक्त पुस्तकातच पाहायला मिळतील. सूर फाट्या, अंडी का पाणी, विटी दांडू,लपाछपी,मातीची वाळूची घरटी, आंब्याच्या कोयांचा डाव असे खेळ खेळणाऱ्या मुलांच्या हाती मोबाईल नामक वस्तू आल्यामुळे हळूहळू बंद होऊ लागले आहेत.

 

खेडेगावातील घरात माणसांच्या इतकाच प्राण्यांचा वावर असतो.ते कुटुंबाचा एक अविभाज्य घटक असतात म्हणूनच मोन्या हा लेख संवेदनशील मनाच्या लेखिकेच्या मनाचा वेध घेते. मोन्या प्रेम वाचताना नकळत वाचकांच्या मनात प्राणी प्रेम जागृत होते.

 

या लेखसंग्रहातील साध्या सोप्या लालीत्य पूर्ण भाषा शैली मधील प्रत्येक लेख वाचकांना त्यांच्या स्वतःच्या आठवणींत हरवून नेईल, कधी हसवेल, कधी डोळ्यांत टचकन पाणी आणेल, तर कधी जगण्याचा नवा अर्थ देईल. लेखनाच्या या प्रवासात शब्दांमधून आठवणी साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांना या शब्दसंवादातून निश्चितच आनंद होईल याचा मला विश्वास आहे.


सौ पुष्पलता युवराज मिसाळ
              सांगोला


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here