
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई –
“सध्याचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण फारसं वेगळं नाही” अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिश्कील शैलीत राज्याच्या राजकीय परिस्थितीवर उपरोधिक टोला लगावला. शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आवर्जून हजेरी लावत आपल्या खास शैलीत भाषण करत राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकला.
आजार आणि राजकारणाची तुलना
“गेले दोन दिवस तब्येत थोडी नरम आहे. आज आलो खरा, पण सकाळीच मला काहीच ताकद वाटत नव्हती. काय झालंय ते डॉक्टर सांगत नाहीत. पूर्वीचे आजार ताठ मानेने सांगितले जायचे – मलेरिया आहे, टायफॉईड आहे, असं सरळ. पण हल्लीचे आजार तसे नाहीत. लपून-छपून येतात. अगदी सध्याच्या राजकारणासारखेच,” असं म्हणत त्यांनी वातावरण हलकंफुलकं केलं.
“हा त्या पक्षात गेला, तो इथे आला – व्हायरल आहे!”
राजकीय पक्षांतरांच्या वाढत्या ट्रेंडवरही राज ठाकरे यांनी मिश्कील भाष्य केलं.
“हा त्या पक्षातून त्या पक्षात गेला, तो या पक्षातून त्या पक्षात आला. लोक विचारतात काय झालं? मी म्हणतो – व्हायरल आहे! महाराष्ट्रात हे ‘व्हायरल’ खूप फिरतंय,” अशी उपहासात्मक टिप्पणी करत त्यांनी उपस्थितांमध्ये हास्याची लहर उसळवली.
राजकारणाचा उदारपणा हरवला – राज यांची खंत
राज ठाकरे यांनी यावेळी जुन्या राजकारणाच्या उदारतेचाही उल्लेख केला.
“शेकाप हा पक्ष स्वातंत्र्यपूर्व काळात – ३ ऑगस्ट १९४७ रोजी स्थापन झाला. स्वातंत्र्याच्या आधीच अस्तित्वात आलेला राज्यातील एकमेव पक्ष म्हणजे शेकाप. इतक्या वर्षांनंतरही टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
“१९८१ साली शिवसेनेचं पहिलं अधिवेशन झालं होतं, तेव्हा कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. तेव्हा शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये किती वैचारिक मतभेद होते, तरीही तो उदारपणा होता. भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज आला. आज मात्र लाल व्यासपीठावर दोन भगवे ध्वज आले आहेत,” असे म्हणत त्यांनी आजच्या राजकारणातील संकुचिततेवर खंत व्यक्त केली.
“जयंतरावांनी आग्रह केला म्हणून आलो”
कार्यक्रमाच्या आयोजक आणि शेकाप नेते जयंतराव पाटील यांच्या आग्रहास्तव आपण कार्यक्रमाला आलो, असेही त्यांनी शेवटी नमूद केलं.