
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : पंचायत समिती आटपाडी येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तृणधान्याचे विविध पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते. या स्पर्धेचे गटशिक्षणाधिकारी जगन्नाथ कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी व त्यांच्या सहकारी यांनी काटेकोरपणे परीक्षण केले.
या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा पुजारवाडी आटपाडीच्या माता पालक सौ करिश्मा सचिन वाघमारे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांनी तृणधान्याचे विविध पौष्टिक पदार्थ करून त्याची आकर्षक अशी मांडणी केली होती. त्यांनी बनविलेल्या पदार्थांमध्ये जवळजवळ सर्व तृणधान्याचा वापर केल्याचे दिसून आले. ज्वारीच्या हुरड्याची भेळ, गव्हाच्या कोंड्याचे मुटके, बाजरीचे हुंडे, नाचणीची खीर, ज्वारीची मॅगी असे विविध पौष्टिक पदार्थ त्यांनी या स्पर्धेसाठी बनवून आणले होते. तसेच त्याची कडधान्याचा वापर करून त्यांची उत्कृष्ट अशी सजावट देखील केली होती .परीक्षणा वेळी त्यांनी आपल्या पदार्थांचे उत्कृष्ट असे सादरीकरण केले.