
माणदेश एक्सप्रेस न्यूज | ठाणे :
राज्यात सर्वत्र नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा होत असताना ठाण्यातील उल्हासनगर येथे एका गरबा कार्यक्रमात दहशतीचा थरार अनुभवायला मिळाला. गरब्याच्या रंगलेल्या कार्यक्रमात एका सराईत गुन्हेगाराने शिवसेना शाखाप्रमुखावर बंदूक रोखली आणि हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी व त्याच्या वडिलाला अटक केली आहे.
मंगळवारी (1 ऑक्टोबर) रात्री साडेअकरा वाजता ही घटना उल्हासनगर कॅम्प क्र. 2 मधील 24 नंबर शाळा परिसरातील बंजारा विकास परिषदेच्या ठिकाणी घडली. येथे बालाजी मित्र मंडळाच्या वतीने गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे होते.
दरम्यान, स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार (वय 19) हा कार्यक्रमस्थळी आला. त्याने थेट बाळा भगुरे यांना अडवून प्रश्न केला, “गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का? मी इकडचा भाई आहे!” या धमकीनंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित प्रेक्षक व महिला घाबरल्या. त्याच क्षणी सोहमने आपल्या जवळील बंदूक काढून बाळा भगुरे यांच्यावर रोखली.
परिस्थिती गंभीर होताच बाळा भगुरे यांच्या भावाने प्रसंगावधान दाखवून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या सोहमने दहशत निर्माण करण्यासाठी थेट हवेत दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारामुळे गरबा थांबला आणि प्रेक्षकांमध्ये चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. यावेळी सोहमचा वडील अनिल पवार देखील मुलाच्या पाठीशी उभा राहून धाक दाखवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. बाळा भगुरे यांनी तातडीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
बुधवारी सकाळी पोलिसांनी विशेष मोहिम राबवत कॅम्प क्रमांक 4 येथून आरोपी सोहम पवार आणि त्याचे वडील अनिल पवार यांना अटक केली. त्यांच्याकडून वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. महिलावर्ग व लहान मुलांना या घटनेमुळे मोठा मानसिक धक्का बसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांनी सोहम पवारविरुद्ध आधीपासून गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचेही स्पष्ट केले आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिस तपास अधिक गांभीर्याने सुरू आहे.