
ठाणे | प्रतिनिधी –
कर्तव्यनिष्ठा आणि मानवतेचा अनोखा संगम दाखवणाऱ्या एका तरुण अग्निशमन जवानाचा जीव दुर्दैवाने कर्तव्य बजावत असतानाच गेला. ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील उत्सव पाटील (वय २८) या जवानाचा कबुतर वाचवताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी दिवा-शीळ रोडवरील खर्डीगावात घडली. या घटनेने ठाणे शहरासह राज्यातील अग्निशमन दलात शोककळा पसरली आहे.
रविवार, १२ ऑक्टोबर रोजी खर्डीगाव परिसरात एका ओव्हरहेड विजेच्या तारांवर कबुतर अडकल्याची माहिती दिवा अग्निशमन केंद्राला मिळाली. नेहमीप्रमाणे तत्परतेने जवान घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी उत्सव पाटील आणि त्यांचा सहकारी आझाद पाटील हे दोघे कबुतराला तारांमधून सोडवण्याचा प्रयत्न करत होते.
दरम्यान, उत्सव पाटील यांनी तारांच्या जवळ पोहोचताच हाय व्होल्टेज विजेचा जबर धक्का बसला. विजेच्या तीव्र प्रवाहाने ते बेशुद्धावस्थेत खाली कोसळले. सोबत असलेल्या आझाद पाटील यांनाही विजेचा झटका बसून ते जखमी झाले. तत्काळ दोघांनाही कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उत्सव पाटील यांना मृत घोषित केले.
केवळ २८ वर्षांचा उत्सव पाटील हा ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलात कार्यरत होता. त्याच्या मित्रपरिवारात, सहकाऱ्यांमध्ये आणि कुटुंबात तो नेहमी आनंदी व तत्पर म्हणून ओळखला जायचा. एका निष्पाप जीवाला वाचवण्यासाठी तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुढे सरसावला, पण नियतीपुढे तो हारणं आलं.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आणि सहकारी जवानांनी महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मदतकार्यातील जवानांना योग्य सुरक्षा साधनांचा अभाव, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती ही गंभीर बाब असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. “जवानांचे प्राण धोक्यात घालून काम करावं लागतं, पण प्रशासनाकडून आवश्यक साधनं आणि सुरक्षा उपकरणे वेळेवर मिळत नाहीत,” अशी खंत सहकाऱ्यांनी व्यक्त केली.
ठाणे महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अग्निशमन दलात कार्यरत असलेल्या इतर जवानांनीही सुरक्षा साधनांची तातडीने उपलब्धता आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कर्तव्यावर प्राण अर्पण करणाऱ्या उत्सव पाटील यांच्या निधनाने ठाणे शहर हळहळले आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला अनेक सहकारी, स्थानिक नागरिक, तसेच समाजातील विविध घटकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. “एक कबुतर वाचवताना गेलेलं आयुष्य… पण त्याचं बलिदान निष्काळजी व्यवस्थेच्या काळ्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब करतं,” अशा शब्दांत नागरिकांनी भावना व्यक्त केल्या.