शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा दुसरा टिझर; ठाकरे बंधूंची जोडी रंगणार?

0
71

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई :
शिवसेनेतील फुटीनंतर गेल्या दोन वर्षांत शिवाजी पार्कावर दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिंदे सेना आणि उद्धव सेनेत चुरस पाहायला मिळाली. “बाळासाहेबांचा वारसा कोणाकडे?” हा प्रश्न सभागृहात आणि रस्त्यावरून उपस्थित झाला. दोन्ही गटांनी आपापले शक्तीप्रदर्शन करताना परंपरेचा ठेका आपणच पुढे नेत आहोत, असा दावा केला. परंतु, यंदा परिस्थिती काहीशी वेगळी आहे. उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येण्याच्या हालचालींमुळे दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.


उद्धव सेनेने दसरा मेळाव्याचा दुसरा टिझर प्रसिद्ध केला आहे. “परंपरा महाराष्ट्राची, मैदान शिवतीर्थाचं, आवाज शिवसेनेचा, नेतृत्व ठाकरेंचं, हुंकार शिवसैनिकांचा” या घोषवाक्याखाली प्रसिद्ध झालेल्या टिझरमुळे शिवसैनिकांचा उत्साह उंचावला आहे. शिवाजी पार्कवर यंदाही भव्य प्रमाणावर दसरा मेळावा होणार असून गर्दीचे रेकॉर्ड मोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे. ५ जुलै २०२५ रोजी हिंदी सक्तीविरोधी आंदोलनात दोन्ही भाऊ पहिल्यांदा एकत्र आले. त्यानंतर त्यांची अनेक वेळा गाठभेट झाली. विविध मुद्द्यांवर चर्चेचे फेरे पार पडले. यंदाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार का? याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्धव सेनेकडून त्यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आलं आहे की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र, दोन्ही ठाकरे एकत्र दिसले तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.


यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न या भाषणाच्या केंद्रस्थानी असतील, असे संकेत आहेत. अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारला धारेवर धरून उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या वेदनांना आवाज देतील, अशी अपेक्षा आहे.


शिवाजी पार्कावर दसरा मेळावा हा शिवसेनेची परंपरा मानला जातो. बाळासाहेब ठाकरे यांच्या दमदार भाषणांपासून सुरू झालेल्या या मेळाव्यातील जोश, शब्दांना धार आणि राजकीय टीकाटिप्पणी हे वैशिष्ट्य ठरले आहे. फुटीनंतर उद्धव सेना आणि शिंदे सेना या दोन्ही गटांनी शिवतीर्थावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यंदा उद्धव सेना आणि मनसे एकत्र येऊन मैदान गाजवणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असला तरी शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.


उद्धव सेनेचा दुसरा टिझर प्रसिद्ध झाल्याने दसरा मेळाव्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. ठाकरे बंधू एकत्र येतात का, की हे फक्त राजकीय अटकळी ठरतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र, इतकं निश्चित आहे की, शिवतीर्थावरील यंदाचा दसरा मेळावा हा केवळ परंपरेपुरता मर्यादित न राहता राज्यातील आगामी राजकारणाचा मोठा टप्पा ठरणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here