
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई/प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप झाला आहे. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या या भेटीने संभाव्य युतीची जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही जवळीक शिंदे गटासाठी मोठे आव्हान ठरू शकते.
ठाकरे बंधूंची ‘मातोश्री’वर भेट – राजकीय चर्चा पुन्हा उफाळल्या
रविवारी, २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस ‘मातोश्री’वर जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने राज ठाकरे स्वतः ‘मातोश्री’वर गेले आणि उद्धव ठाकरेंना लाल गुलाबाचे पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. या भेटीच्या वेळी शिवसेना नेते संजय राऊत, अंबादास दानवे, तसेच मनसेचे बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते.
ही भेट जरी ‘कौटुंबिक’ असल्याचे सांगण्यात येत असले, तरी राजकीय वर्तुळात तिचे अर्थ अनेक पातळ्यांवर लावले जात आहेत. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात दोघेही ठाम भूमिका घेत असल्याने, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर दोघांची युती होण्याची शक्यता अधिकच बळकट झाली आहे.
शिंदे गटात घबराट – पक्षप्रवेश अचानक थांबले
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत होणारे पक्षप्रवेश गेल्या काही दिवसांत थांबल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश होणे अपेक्षित होते. मात्र, ठाकरे बंधूंच्या जवळीकतेमुळेच ही चळवळ थांबली असल्याचे बोलले जात आहे.
मराठी मुद्द्यावर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
हिंदी भाषेच्या लादणीच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधू आक्रमक भूमिकेत आहेत. मराठी भाषेच्या सन्मानासाठी एकत्र आलेली ही ऊर्जा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत आहे. दोन्ही पक्षांमध्ये बेरजेचे राजकारण सुरू झाल्यास, शिवसेना (शिंदे गट) व भाजपला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
महानगरपालिका निवडणुकीत प्रभाव – शिंदेंना फटका?
मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. अशा वेळी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास, त्यांचा प्रभाव केवळ मुंबईपुरता मर्यादित न राहता ठाणे, नाशिक आणि औरंगाबादपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे शिंदे गटासाठी ही युती ‘धोक्याची घंटा’ ठरू शकते, असा स्पष्ट संकेत सध्या घडणाऱ्या घडामोडींमधून मिळतो आहे.
मराठवाड्यात भाजपचा मोठा झटका; काँग्रेसचे दिग्गज भाजपात
दुसरीकडे, मराठवाड्याच्या राजकारणातही मोठी उलथापालथ होत असून, भाजपने काँग्रेसमध्ये जोरदार फूट पाडली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल, ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर हे आज मंगळवारी, २९ जुलै २०२५ रोजी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्या या पक्षप्रवेश मोहिमेमुळे नांदेड व परभणी जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व संकटात आले आहे. भाजपने संघटनात्मक पातळीवर मराठवाड्यात आपली ताकद वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केला असून, काँग्रेसला मोठा राजकीय झटका बसण्याची चिन्हे आहेत.